भोपाळ : माणसाचा मृत्यू हे एक अटळ सत्य असले तरी एखाद्या माणसाच्या निधनानंतर त्याच्या नातेवाईकांना नंतर सर्व क्रियाविधी पूर्ण करावे लागतात. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अशा प्रकारचे विधी केले तर ते समजण्यासारखे असले तरी मध्यप्रदेशातील विकास पाचौरी नावाची व्यक्ती केवळ समाजसेवेचा भाग म्हणून अंत्यसंस्काराकडे पाहत असून आज पर्यंत त्यांनी 5 हजार लोकांवर मोफत अंत्यसंस्कार केले आहेत.
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ पासून 60 किलोमीटरवर विदिशा शहरात विकासची ही मोफत सेवा सुरू असून त्याचा हा आदर्श अनेकांनी घ्यावा असाच आहे. कोणाला गरज लागल्यास ते कधीही विकासला फोन करतात आणि विकास आपली शववाहिनी घेऊन त्वरित त्या ठिकाणी उपस्थित होतो. रात्री बेरात्री कधीही विकासला फोन केला तरी तो आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर करत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामासाठी तो एक पैसाही घेत नाही. हे सर्व काम समाजसेवेच्या माध्यमातून मोफतच करतो आज पर्यंत पाच हजार पेक्षा जास्त अंत्यसंस्कार अशा प्रकारे समाजसेवा म्हणून पार पाडले आहेत.
विकासने या कामासाठी स्वतःची अशी परिभाषा तयार केली आहे. कोणाच्या मृत्यूचे वर्णन तो शांत होणे या शब्दात करतो तर अंत्यसंस्काराचे वर्णन सेवा असे करतो आणि त्याच्या शववाहिनीचे वर्णन सेवा वाहिनी असे करतो. त्याच्या सेववाहिनीचा चालक तो स्वतःच असून हे वाहन जेव्हा शहरातून फिरत असते तेव्हा त्याच्यावर धार्मिक भजने लावली जातात. एका दिवसात चार ते पाच अंत्यसंस्कार विधी करण्याचे काम विकास करतो.
2013 पासून विकास या कामात आहे. 2013 मध्ये त्याच्या घरात भाडे करू म्हणून राहत असलेला एका व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाले पण रात्री अपरात्री निधन झाल्याने कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्या भाडेकडूने अनेकांना फोन करून सुद्धा काही सोय झाली नाही. तेव्हा विकासने आपले वाहन उपलब्ध करून दिले आणि तेव्हाच अशा प्रकारची सेवा इतरांनाही द्यायला हवी अशी मनात आले आणि गेले दहा वर्ष तो ही सेवा मोफत करत आहे. सर्व धर्माच्या व्यक्तीसाठी विकासची ही सेवा उपलब्ध आहे. करोना महामारीच्या कालावधीमध्ये मृत्यूची संख्या वाढत असताना सरकारी यंत्रणांनी हात वर केले असताना विकासने आपल्या या यंत्रणेच्या माध्यमातून अनेकांवर अंत्यसंस्कार केले. त्याच्या या कामाचे केवळ मध्यप्रदेशातच नाही तर देशात सर्वत्र कौतुक होत आहे.