पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ऍन्ड ट्रेनिंगच्या (मॅनेट) खेळाडूंनी सर्वाधिक 18 सुवर्ण, 18 रजतपदके जिंकत प्रथम क्रमांक पटकावले. तसेच एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन यांनी 15 सुवर्ण आणि 15 रजतपदक जिंकत दुसरे, तर एमआयटी स्कूल इंजीनिअरिंगच्या खेळाडूंनी 9 सुवर्ण आणि 6 रजतपदक जिंकत तिसरे क्रमांक पटकावले.
आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2019 च्या सर्वसाधारण विजेत्यांसह सर्व 13 खेळ प्रकारातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेत्यांना पदक आणि करंडक देऊन गौरविण्यात आले. मिस्टर इंडिया आंतरराष्ट्रीय पदक विजेता धारासिंग खुराना, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी 13 खेळांचा समावेश करण्यात आला होता. क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), बुद्धिबळ (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष व महिला), क्रास कंट्री (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष), टेनिस (पुरुष) स्वीमिंग (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), ऍथलेटिक्स (पुरुष व महिला), कब्बडी (पुरुष), बास्केटबॉल या खेळांचा समावेश होता, तर यात 772 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.