कर्जत – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती -उपसभापती निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकाचे मते फुटल्याचे जोरदार पडसाद आता उमटू लागले आहेत. मते फुटल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत असून त्यांनी आज थेट कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळे फासत “गद्दार’ असे लिहिले आहे. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीदरम्यान आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांच्या नेतृत्वाखाली मंडळांना समान संख्याबळ असताना या निवडीत आ. शिंदे हे राष्ट्रवादीची मते फोडण्यात यशस्वी झाले. त्यामुळे फुटलेल्या संचालकांबाबत आ. पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आज कर्जतमध्ये पहावयास मिळाले.
राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे आ. शिंदे गटाकडे गेली. तो राग मनात धरून आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर “गद्दार’ असे लिहिले व “कोण गेला रे कोण गेला राष्ट्रवादीचा गद्दार गेला’ अश्या घोषणा देत तीव्र निषेध केला, तसेच आमदार रोहितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
बाजार समितीमध्ये आ. शिंदे यांच्या गटाचे 9 तर आ. रोहित पवार यांच्या गटाचे 9 उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे राम शिंदे यांच्या गटाला मिळाल्याने आ. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र त्यानंतर लिहिलेले नाव पुसण्यात आले आहे.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळे फासत गद्दार असे लिहिल्याने तालुक्यासह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. संचालक फोडण्यामागे नेमका हात कोणाचा अश्या चर्चा झडु लागल्या आहेत. जिल्हा बॅंकेच्या पराभवाचे देखील खापर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी फाळकेंवर फोडले होते. कर्जत बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीनंतर फाळके पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे आता पक्षात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे