खडकवासला –रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे एका गृहिणीचे दोन लाख रूपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिणे परत मिळाले. कैलास मते (रा. खडकवासला ता. हवेली) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.
सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलापासून नऱ्हे येथे जाण्यासाठी भाडे मिळाले. सांगोला या मुळ गावावरून आलेल्या माधुरी दादासो पवार (वय 28) आणि त्यांचा भाऊ अमोल सुखदेव शिंदे (वय 32) आणि माधुरी यांचा चार वर्षांचा मुलगा यांनी रिक्षातून नऱ्हेपर्यंत प्रवास केला. त्यादरम्यान माधुरी या रिक्षातसिटच्या मागे दागिन्यांची पर्स विसरल्या. रिक्षात पर्स विसरल्याचे माधुरी यांच्या संध्याकाळी उशीरा लक्षात आले. तर, रिक्षाचालक मते यांना रात्री घरी गेल्यानंतर रिक्षात पर्स असल्याचे निदर्शनास आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मते यांनी हवेली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून रिक्षात पर्स विसरल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पर्स तपासली असता त्यामध्ये दोन लाख रूपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने आढळले. पोलिसांनी नऱ्हे येथे शोध घेत माधुरी पवार यांना त्यांचे दागिने परत केले.