चित्रपट हे निखळ मनोरंजनाचे साधन होय. धीर-गंभीर चित्रपटाच्या तुलनेत हलक्याफुलक्या, विनोदी चित्रपटांना श्रोते अधिकच लाभले आहे. पूर्वीच्या काळात चित्रपटात विनोदाचे प्रसंग पेरलेले असायचे. एखादी गंभीर घटना झाल्यानंतर काही काळ विरंगुळा मिळावा म्हणून मेहमूद, असरानी, कादरखान यासारखी मंडळी अधूनमधून प्रेक्षकांना हसवायची. तरीही नायक-नायिकांच्या रोमांसपुढे विनोदी नटांचे काम हे अपूर्ण वाटू लागले; परंतु कालांतराने या विनोदाचा ताबा नायकांनीच घेतला. अनिल कपूर, गोविंदा, आमीरखान या मंडळींनी स्वत:च विनोदी प्रसंग साकारल्याने विनोदी कलाकारांना फारसे स्थान राहिले नाही. मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट “पागलपंती’ हे त्याचे ताजे उदाहरण.
अक्षय, अभिषेक आणि रितेशची केमिस्ट्री
हाऊसफुलच्या सिक्वेलमध्ये अक्षयकुमारने दमदार विनोद करत यश मिळवले आणि कौतुकाची थापही मिळवली. हाऊसफुल चारमध्ये अक्षयकुमार, कृती सेनन, रितेश देशमुख, कृती खरबंदा, बॉबी देओल आणि चंकी पांडे यांनी अतिशय चांगले काम करत श्रोत्यांची वाहवा मिळवली. हाऊसफुल तीनमध्ये रितेश देशमुख, अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, बोमन इराणीनेदेखील खूप हसविले होते. अभिनेता कोणीही असला तरी विनोदी प्रसंगात प्रत्येक जण नायक आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.
संजय दत्त कॉमेडियन
संजय दत्तने गंभीरविषयांव्यतिरिक्त अनेक विनोदी चित्रपटदेखील केले आहेत. 2003 आणि 2008 मध्ये मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल. यात संजय दत्त, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि त्यानंतर सिक्वेलमध्ये अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून श्रोत्यांचे मनोरंजन केले. त्यांचा “धमाल’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला. हा अफलातून विनोदी चित्रपट ठरला. संजय दत्त, रितेश देशमुख, अर्शद वारसी, आशिष चौधरी, जावेद जाफरी यांची प्रमुख भूमिका होती. असरानीने या चित्रपटात चार चांद लावले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवणारा आणि भरपूर हसवणारा मसालापट ठरला.
आमीरखान-सलमान खानची देखील कॉमेडी
“अंदाज अपना अपना’ हा तर फुल टू मस्तीने भरलेला विनोदीपट होता. सलमान खान, आमीरखान यांची प्रमुख भूमिका होती. तर परेश रावल, रविना टंडन, करिष्मा कपूर, शक्ती कपूर या मंडळींनी भरपूर हसविले. आमीरखानचा “थ्री इडियट’ देखील दर्जेदार विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
इरसाल गोविंदा
1990 च्या दशकात गोविंदा आणि विनोद असे समीकरण बनले होते. गोविंदा-कादरखान आणि जॉनी लिव्हर या तिकडीने धमाल उडवून दिली. दुल्हे राजा या चित्रपटात गोविंदा आणि कादरखान यांची जुगलबंदी आजही लोकांना भरपूर हसवते. पंचतारांकित हॉटेलचा मालक आणि ढाबाचालक यांच्यातील भांडणे आणि त्यात बहरलेले प्रेम लोकांना चांगलेच भावले. जॉनी लिव्हरने तर सर्वोत्तमविनोदी अभिनेत्याचे फिल्मफेअर पटकावले.
अर्शद वारसीचा डाव
संपूर्णपणे कॉमेडी करणाऱ्या नटात अर्शद वारसीचे नाव आघाडीने घेतले जाते. मुन्नाभाई एमबीबीएस, धमाल, काबुल एक्सप्रेस, गोलमाल सिरिज, जॉली एलएलबी आदीतून आपल्या अर्शदचा जलवा पाहावयास मिळतो. वास्तविक इश्किया, देढ इश्किया यासारख्या गंभीर चित्रपटातही अर्शद वारसीने कॉमेडी अप्रतिमरीत्या पेरली. संवाद फेक, देहबोली आणि अभिनयातील बारकाव्याच्या आधारावर अर्शदने बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला. अर्शद वारसी हा 21 व्या शतकातील बॉलिवूडचा सर्वोत्तम हास्य कलाकार म्हणून म्हटले तर वावगे ठरणार नाही.
रितेश देशमुखचे फटकारे
रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये नायकरूपातून पदार्पण केले होते. आजही अनेक चित्रपटांतून तो नायक म्हणूनच दिसतो. मात्र, रितेशच्या अभिनयात विनोद ठासून भरलेला आहे. हाऊसफुल, क्या कुल है हम, मस्ती, धमाल, हे बेबी या चित्रपटातून रितेशचा विनोद पाहू शकतो. रितेशने हिंदी चित्रपटात विनोद जिवंत ठेवला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
दीपक डोबरियालची दमदार कॉमेडी
ज्या मंडळींनी ओमकारा पाहिला असेल, त्यांना दीपकची भूमिका चांगल्या रितीने आठवत असतील. त्यात भूमिका खूपच लहान होती. मात्र, या दीपकला प्रशंसा आणि ओळख मिळाली ती “तनू वेडस् मनू’तील पप्पी जी के या भूमिकेने. हे विनोदी पात्र इतके लोकप्रिय ठरले की त्याच्या सिक्वेलमध्येही हेच पात्र पुन्हा साकारण्यात आले. वास्तविक त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी “नॉट अ लव्ह स्टोरी’मध्ये एका मारेकऱ्याची भूमिका केली. आजच्या चित्रपटात विनोदी बाज जिवंत ठेवण्याचे काम दीपक डोबरियाल करत आहेत.
विनय पाठकची दर्जेदार कॉमेडी
विनय पाठक यांच्या नसानसात विनोद भरलेला आहे. भेजा फ्राय आणि भेजा फ्राय-2 मधील रागीट मुलगा आपल्या लक्षात असेल. तो आपल्याला त्रासही देतो आणि हसवतोही. “रब ने बनाई जोडी’मध्येही त्यांनी साकारलेली शाहरुख खानचा मस्तमौला पंजाबी मित्राची भूमिका देखील दमदार होती. विनय पाठकने एकाहून एक सरस भूमिका करत श्रोत्यांचे कौतुक मिळवले आहे.
संजय मिश्रादेखील आघाडीवर
संजय मिश्रा हे एक दमदार अभिनेते आहेत. मसान आणि फंस गये रे ओबामामध्ये संजयच्या अभिनयाचे कौतुक कराल तेवढे कमीच आहे. त्यांच्या अभिनयाला खरोखरच तोड नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संजय मिश्रा हे दमदारपणे कॉमिक रोल करत आहेत. अलीकडेच त्यांची हास्य भूमिका “दिलवाले’मध्ये पाहावयास मिळाली. त्यांच्या विनोदी अभिनयाने श्रोते देखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
कॉमेडी किंग बोमन इराणी
बोमन इराणी यांची बॉलिवूडनमध्ये इंनिंग उशिरा सुरू झाली असली तरी ती धडाकेबाज झाली आहे. यासाठी त्यांचे चित्रपट पाहा. मुन्नाभाईमधील डॉ. अस्थानाचे पात्र पाहा. हे एक रोल मॉडेल ठरले आहे. त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपटात त्यांनी दमदार कॉमेडी केली आहे. थ्री इडियटच्या अभिनयाने तर त्यांच्या करियरला बुस्ट मिळाला. ब्लफ मास्टर, खोसला का घोसला, हाऊसफुल या चित्रपटाचा विशेत्वाने उल्लेख करता येईल.
हसवणारा वरुण शर्मा
फुकरेमधील चुचा लक्षात आहेत का. तोच वरुण शर्मा होय. हा मुलगा नवीन असला तरी धमाल कॉमेडी करतो. त्याने चित्रपटाची सुरुवातच विनोदाने केली आहे. पहिल्याच चित्रपटात वरुणने दमदार विनोदी अभिनय केला होता. या कारणामुळेच तो त्याचे आगमन होऊन पाच वर्षे झाले तरी त्याला अजूनही चुचु नावानेच ओळखतात. त्याने अलीकडेच डॉली की डोली, किस किस को प्यार करू मध्येही लहानसहान भूमिका साकारल्या. अलीकडेच अर्जुन पटियालामध्येही त्याने श्रोत्यांना खूप हसविले. अशावेळी तो नवीन विनोदी अभिनेता म्हटल तर चूक ठरणार नाही.
सदाबहार परेश रावल
परेश रावल यांची बॉलिवूडमधील सुरुवात खलनायकाने झाली ही बाब फार कमी लोकांना ठावूक असेल. 1984 रोजी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. तब्बल तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. आजही ते आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांत लोकप्रिय आहेत. परेश रावल यांचा विनोद म्हणजे सुपरडुपर हिटची खात्री. एक दशकापेक्षा अधिक काळापासून परेश रावल हे दर्जेदार सिग्नेचर कॉमेडियन म्हणून काम करत आहेत. परेश रावल यांनी “हेराफेरी’साठी सर्वोत्तम हास्य अभिनेता म्हणून फिल्मफेअरचे पारितोषिक पटकावले आहे.
राजपाल यादव
राजपाल यादवचा विनोद हा नैसर्गिक मानला जातो. राजपालच्या करियरची सुरुवात दूरदर्शनवरील मालिका “मुंगेरी के भाई नौरंगीलाल’ ने केली होती. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पासआऊट आहेत. त्यांचा विनोद कमालीचा आहे. कमी उंचीचे असणारे राजपाल हा श्रोत्यांना हसवण्यात कोणतीही कसूर ठेवत नाहीत. विनोदी नट राजपाल हे स्क्रीन प्ले रायटरदेखील आहेत. मै, मेरी पत्नी और वो यासाठी राजपाल यांचे कौतुक झाले. सध्याच्या विनोदी नटांबरोबरच मागील काळातील काही सहायक अभिनेत्यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. कादरखान, जॉनी वॉकर, भगवान दादा, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, मेहमूद, केश्तो मुखर्जी ओमप्रकाश हे जुन्या काळातील दिग्गज विनोदी अभिनेते मानले जातात. एवढेच नाही तर मराठीतील लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांतून कॉमेडी करून श्रोत्यांची मने जिंकली आहेत. मैने प्यार किया, साजन, हम आपके है कौन, अनाडी या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेले पात्र आजही चाहत्यांच्या मनावर कोरलेले आहेत. विनोद केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही तर महिलांनी देखील त्यात बाजी मारली आहे. जुही चावला, रविना टंडन, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, करिना कपूर, राणी मुखर्जी, किरण खेर आदींनी देखील चित्रपटात भरपूर कॉमेडी केली आहे.
पहिली महिला कॉमेडियन टूनटून
उमादेवी खत्री अर्थात टूनटूनला कोण ओळखत नाही. ज्या काळात मुलींना घराबाहेर पाठवत नसत, अशा काळात टूनटूनने चित्रपटात विनोदी अभिनयाने दबदबा निर्माण केला होता. त्यांनी दोनशेच्या आसपास हिंदी चित्रपटात काम केले आहे. जॉनी वॉकर, भगवानदादा, धुमाळ यांसारख्या सहकलाकारंसमवेत टूनटून यांनी धमाल केली आहे. टूनटून या पहिल्या भारतीय महिला हास्यकलाकार आहेत. याच पावलावर पाऊल टाकत गुड्डी मारुतीने देखील विनोदी प्रसंग करण्यात आघाडी घेतली.
सोनम परब