नगर – विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता संघटना आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. विधानसभेत सर्वाधिक सहा जागा जिंकल्याने या नवनिर्वाचित आमदाराचा सत्कार सोहळा सोमवारी दि. 9 रोजी आयोजिक केला असून या सोहळ्याच्या निमित्त्याने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा घाट घातला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक सहा जागा मिळविल्या. त्याबरोबर राज्यातील सत्ता समिकरणे बदलली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पाच वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली आहे. तो उत्साह साजरा करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबर येत्या 12 डिसेंबरला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तोही जंगी करण्याचा घाट घातला आहे.
पवारांचा 80 वा वाढदिवस आल्याने जिल्ह्यातून 80 लाखाची थैली त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने फाळके यांच्यासह सर्व नेते व कार्येकर्ते प्रयत्नशिल आहेत. दि.9 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, नीलेश लंके, डॉ. किरण लहामटे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांचा सत्कार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राजेंद्र फाळके हे असतील. यावेळी पक्षाचे निरीक्षक अकुंश काकडे यांच्यासह पक्षातील माजी आमदार, माजी खासदार, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून पक्षाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.