पिंपरी -शहरात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच वातावरण बदलामुळे मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. दवाखान्यात या रुग्णांची गर्दी वाढली आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत खासगी दवाखान्यांमध्ये नागरिक येत आहेत.
वातावरणात झालेल्या बदलामुळे सगळीकडे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. सध्याच्या करोना संसर्गाची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नगरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील छोट्या दवाखान्यांत साथीचे आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
या दवाखान्यांत बहुतांशी याच लक्षणाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लक्षणेही सारखीच असल्यामुळे अनेक जण करोना चाचणी करण्यास पुढाकार घेत नाहीत. चाचणी केल्यानंतर बाधित आढळल्यास विलगीकरणात राहावे लागेल, त्यामुळे अनेक जण चाचणी करण्यास टाळाटाळ करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. एखाद्या रुग्णास सतत तीन दिवस ताप, सर्दी किंवा अंगदुखी असेल तर त्याला करोना चाचणी करण्याचे डॉक्टरांकडून आवाहन केले जात आहे.
गेल दोन दिवसांपासून शहरातील गारठा वाढला असून, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळीने शहरात हजेरी लावली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर धुके पडत आहे. वातावरण बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.