पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांची संख्या अवघी 3.10 टक्के इतकी आहे.
शहरात सध्या 10947 उपचाराधीन रुग्णांपैकी फक्त 341 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यापैकी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 41 आण कोविड केअर सेंटरमध्ये 51 तर खासगी रुग्णालयामध्ये 249 रुग्ण दाखल आहेत. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या 41 रुग्णांपैकी 2 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
तर 7 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील खासगी रुग्णालये व महापालिकेच्या रुग्णालयामध्ये बेड रिकामे आहेत. त्यामुळे नवीन कोविड केअर सेंटर सद्यस्थितीत सुरू केले जाणार नाहीत. तसेच जम्बो रुग्णालयासाठी फक्त स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली आहे. मात्र अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. गरज भासली तरच जम्बो रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी तीव्र लक्षणे असलेले व गंभीर रुग्णांची संख्या अल्प आहे. सर्दी, खोकला अशी लक्षणे रुग्णांमध्ये आहेत. त्यामुळे रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पुरेसे बेड आहेत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.