जुन्नर-विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शाळांच्या वाहनांमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर परिवहन समितीचे अध्यक्ष असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जुन्नर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिला आहे. जुन्नर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या 31 शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये मेमाणे बोलत होते.
ओतूर येथील गाडगे महाराज इंग्रजी माध्यमच्या शाळेचा (सेंट डेबूज इंग्लिश मेडिकल स्कूल) बसचालक दारूच्या नशेत बस चालवताना आढळल्यानंतर या बैठकीचे गुरुवारी (दि. 5) आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या या घटनेत केवळ नशीब बलवत्तर असल्यामुळे या बसमधील 16 विद्यार्थी सहीसलामत सुटले होते. या घटनेनंतर तालुका गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी तालुक्यातील 33 पैकी 31 शाळांतील मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्या होत्या. उर्वरित दोन शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत नसून या 31 शाळांपैकी 30 शाळांचे मुख्याध्यापक या बैठकीला हजर होते.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा करार, चालकाची रीतसर नेमणूक, चालकाची व मदतनीसाची रोजची हजेरी, त्यांच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणीचे दाखले, चांगल्या वर्तनाचा दाखला आदी बाबींची दक्षता शालेय परिवहन समितीने घेणे आवश्यक असल्याचे मेमाणे यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच मद्यपी, व्यसनी चालक किंवा मदतनीसाची नेमणूक करण्यात येऊ नये. बस वाहतूक करताना विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास परिवहन समिती व मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मेमाणे यांनी दिला.
- पोलिसांनी दक्षता बाळगावी
शालेय परिवहन समितीमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने वाहतूक व्यवस्थेबद्दल वेळोवेळी दक्षता बाळगली तर निश्चितपणे बस चालकांच्या निष्काळजीपणावर नियंत्रण बसू शकते, असे मेमाणे यांनी सांगितले. याबाबतचे पत्र तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यात पाठविल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. ओतूर येथील या शाळेला गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत खुलासा मागविला असून या घटनेची माहिती वरिष्ठांकडे पाठविल्याचे समजत आहे.