नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील हवा (delhi news) दिवसेंदिवस खराब होत आहे. दिल्लीतील एकूण हवेची गुणवत्ता सोमवारी नवीनतम 309 अंकांसह ‘अत्यंत खराब’ श्रेणीत पोहोचली आहे. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरमध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावली आहे. येथील हवेची गुणवत्ताही ‘खूप खराब’ श्रेणीत आहे आणि सफर इंडियानुसार, दिल्लीच्या (pollution in Delhi) राष्ट्रीय राजधानी परिसरात हवेची गुणवत्ता 322 अंकांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास स्वच्छ हवा मिळणे दुरापस्त झाले आहे.
दिल्लीच्या आनंद विहार, हसनपूर डेपो, राष्ट्रीय महामार्ग 9 च्या आसपास काही चित्रे समोर आली आहेत, जिथे धुक्यामुळे काहीही स्पष्ट दिसत नाही. तसेच हसनपूर डेपो, राष्ट्रीय महामार्ग येथेही धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. नेहरू पार्क आणि तीनमूर्ती मार्गाच्या आजूबाजूलाही धुके आहे. (Air quality check)
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिल्लीत थंडी वाढू लागली असून वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढू शकते. हवेतील धुलीकण जमिनीच्या जवळ राहतात. त्यामुळे समस्या अधिक गंभीर बनते आहे. हवामान आपल्या हातात नाही, पण स्त्रोतांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आम्ही शेजारी राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांशी बोललो असून, त्यांनी भुस्सा जाळण्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दिवाळी आणि दसऱ्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, गेल्या 10-15 दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढत आहे. आज आपण ते आपल्या डोळ्यांत अनुभवू शकतो. धुके आणि धूर दाट आहे. राजकारणी मंडळींना सामान्य नागरिकांच्या हिताशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. दरवर्षी हिवाळा आला की, ही समस्या निर्माण होतच असते. मात्र, कोणीही यावर कायमस्वरुपी उपाययोजना करत नाही.