नवी दिल्ली – दिल्ली शहरातील (DelhiCity) वायुप्रदुषण कमालीचे वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी रविवारी केली आहे. इयत्ता 6 वी ते 12 पर्यंत शाळांना ऑनलाइन शिकवण्याचा पर्याय आहे असे अतिशी यांनी एक्सवरील पोस्ट मधून जाहीर केले आहे.
आज रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीवर विषारी धुके (Delhi Pollution) पसरले होते. त्यामुळे लोकांना गुदमरून जायला झाले आहे. वाऱ्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे, विशेषतः रात्रीच्या वेळी शांत वाऱ्यांमुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा गंभीर प्लस श्रेणीपर्यंत पोहोचली.हवेचा दर्जा निर्देशांक शनिवारी दुपारी 4 वाजता 415 वरून रविवारी सकाळी 7 वाजता 460 वर घसरला.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबरला बंद ठेवण्याची घोषणा केली होती.वायु प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर विविध उपाययोजले जात आहेत. हवेतील सुक्ष्मकण अत्यंत वाढले असून ते श्वसनाद्वारे मानवी शरीरात खोलवर जाऊन रूतण्याचा धोका वाढला आहे.
सुक्ष्मकणांची जी सुरक्षित पातळी आहे त्याच्या 80 ते 100 पट अधिक मोठे धुलीकण दिल्लीच्या हवेत निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब आणि हरियानात भाताच्या कापणीनंतर त्याच्या पेंढ्या जाळण्याचा जो प्रकार घडतो आहे त्यातून हे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर नियंत्रण मात्र आणता आलेले नाही.