पुणे – राज्याच्या वायू गुणवत्ता निर्देशांक “डेंजर’ पातळीवर आला आहे. त्यातून आता दिवाळी तोंडावर आल्याने या प्रदूषणात आता “फटाक्यां’च्या प्रदूषणाची भर पडणार आहे. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या फटाक्यांचे “टेस्टिंग’ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) बुधवारी केले.
“एमपीसीबी’ने बुधवारी शिवाजीनगर येथील “महात्मा फुले कृषी विद्यापीठा’च्या मैदानावर 14 प्रकारच्या फटाकांचे “टेस्टिंग’ केले. यामध्ये लवंगी फटाके, लक्ष्मी बॉम्ब, डबलबार, लवंगी मोठा फटाका, सुतळी बॉम्ब, हजार आणि दोन हजार फटाक्यांची माळ, आकाशात एकाचवेळी उडणारे 50 शॉर्टचे फटाके आदी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली. ही तीव्रता ध्वनीमापक यंत्राच्या सहाय्याने अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून तपासली.
तपासणी दरम्यान आठ प्रकारच्या फटाक्यांच्या नमुन्यांच्या आवाजाची तीव्रता ही विहित मर्यादेत म्हणजे 125 डेसिबलच्या आत आढळल्याचे “एमपीसीबी’चे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले. दरवर्षी दिवाळीपूर्वी बाजारात उपलब्ध फटाक्यांची “एमपीसीबी’कडून तपासणी करण्यात येते, असा दावा करून यंदाही ती करण्यात आल्याचे विभागाकडून कळवण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी आणि तीव्र आवाजाच्या फटाक्यांचा वापर टाळावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
“फटाक्यांच्या तपासलेल्या 14 नमुन्यांपैकी आवाजासाठी अधिक तीव्रतेचे समजले जाणारे आठ फटाक्यांचे डेसिबल नियमानुसार तपासले असता कमी आढळून आले. शिवाय उरलेल्या सहा फटाक्यांचे डेसिबल हे त्यापेक्षाही कमी पातळीचे होते.” – नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी, “एमपीसीबी