बेकायदेशीर कट्टा हाताळताना गोळी सुटून एकजण जखमी ः टाकळी येथील घटना
शिरूर – टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे गावठी कट्टा हाताळताना अचानक खटका दाबला गेल्याने तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडामध्ये गोळी घुसली; परंतु बेकायदेशीर कट्टा असल्याने जखमी तरुणाने त्याच्या दाजीच्या साह्याने टाकळी हाजी गुणवरे रस्त्यावर ओढ्याजवळ अनोळखी लोकांचे भांडण सुरू असताना अचानक पळून जाण्याऱ्या एकावर गोळीबार केला. त्यात मी रस्त्याने जात असताना ती गोळी चुकून मला लागली असा बनाव केला होता; परंतु पारनेर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून जखमी तरुण व त्याच्या दाजी याच्याकडून हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झाल्याने जखमी तरुण व त्याच्या दाजीवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.
संजय बाळू पवार (वय 23, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) त्याचा दाजी दादाभाऊ किसन चव्हाण (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना 5 मार्च 2020 सकाळी दहाच्या सुमारास घडली. भांडण करणाऱ्या तिघांपैकी कोणीतरी गोळीबार केला व ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडाला लागली असल्याचा बनाव करून संजय हा शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे दाखल झाला. याचा साक्षीदार त्याचा दाजी दादाभाऊ चव्हाण होता. डॉक्टर यांनी त्याच्या उजव्या दंडातून गोळी काढली.
पोलिसांना जबाब देताना हा तरुण आणि त्याचा दाजी यांच्या बोलण्यात तफावत जाणवत असल्याने अहमदनगरचे पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस कर्मचारी निकम, चौगुले, दिवटे, डमळे यांनी गुणवरे- टाकळी हाजी रस्त्यावर ओढ्याजवळ साक्षीदार दादाभाऊ चव्हाण यांच्याबरोबर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली; परंतु तेथे कोठेही काडतूसची पुंगळी व रक्त सांडलेले दिसले नाही. त्यामुळे पोलीस चक्रावले होते.
पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली
दादाभाऊ चव्हाण याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने सत्यस्थितीची कबुली दिली. संजय हा मला भेटण्यासाठी टाकळी येथे आला होता आल्यानंतर त्याच्याजवळील गावठी कट्टा त्याने मला दाखवत होता. कट्टा हाताळत असताना अचानक ट्रीगर दाबले गेल्यामुळे त्याच्यातून गोळी सुटून ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडात घुसली.