4924 थकबाकीदारांकडून 2 कोटी 68 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा
बारामती – बारामती मंडल अंतर्गत वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार 1224 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या वर्गवारीतील 4924 थकबाकीदारांनी 2 कोटी 68 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
महावितरणकडून सद्यःस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरात बारामती मंडल अंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यात (बारामती विभाग) 26 लाख 65 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी 401 वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
तर 1844 वीजग्राहकांनी 73 लाख 14 हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. दौंड व शिरूर तालुक्यात (केडगाव विभाग) 1 कोटी 26 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे 693 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर 1989 ग्राहकांनी 1 कोटी 53 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
तसेच भोर व पुरंदर तालुक्यात (सासवड विभाग) 24 लाख 95 हजार रुपयांच्या थकबाकीमुळे 151 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर, 1091 थकबाकीदारांनी 42 लाख 20 हजार रुपयांचा भरणा केला आहे.
…तर थेट फौजदारी कारवाई
तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर ग्राहक करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधी न राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
महावितरणचे आवाहन
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबीलभरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी (ुुु.ारहरवळीलो.ळप) ही वेबसाइट तसेच मोबाइल ऍपद्वारे “ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.