समुद्र पाहण्यासाठी मुलींचे घरातून पलायन

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा


पोलीस तपासादरम्यान मुंबई गाठल्याचे समोर

पुणे – वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चार अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. दरम्यान, पोलीस तपासात त्यांनी मुंबई गाठल्याचे समोर आले. त्यांना मुंबई पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असता समुद्रकिनारा पाहण्यासाठी मुंबई गाठल्याचे त्यांनी सांगितले. या चारही मुली 12 ते 16 वयोगटातील आहेत.

अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर अवघ्या चार तासांच्या आत त्या मुलींचा शोध घेऊन मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या सुपूर्द केले. रात्री आठ वाजले तरी मुली घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलींकडील असलेल्या मोबाइलचे लोकेशन मिळविले. त्यावेळी त्या चारही मुली वडगाव मावळ परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाला वडगाव मावळ येथे रवाना केले.

या मुली मुंबईकडे जात असल्याची शक्‍यता वाटल्याने वारजे माळवाडी पोलिसांनी मुंबई सीएसटी पोलीस ठाणे, मुंबई नियंत्रण कक्षाला मुलींबाबत माहिती दिली. त्यानंतर मराठे यांनी मुलींचे फोटो आणि वर्णन व्हॉट्‌स ऍपद्वारे पाठवले. त्यानुसार सीएसटी पोलिसांशी संपर्क साधून तेथील ठाणे अंमलदार सहायक पोलीस फौजदार भुमकर यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

यावेळी मराठे यांनी दिलेल्या वर्णनानुसार चार मुली पहाटे साडेतीनच्या सुमारास सीएसटी स्थानकात उतरल्या. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आणि वारजे माळवाडी पोलिसांना ही माहिती कळवली. यानंतर मराठे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक एम. एस. भोईने व त्यांच्यासोबत पथक मुलींना आणण्यासाठी पाठविले. याबाबत पोलीस उपायुक्‍त पौर्णिमा गायकवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांचे मार्गदर्शन मिळाले.

पैंजण विकून प्रवासाचा खर्च
घरातून मुंबई गाठण्याचे ठरवल्यानंतर चारही मुलींनी सोन्या मारुती चौकात पायातील पैंजण विकले. त्या पैशातून बॅगा खरेदी केल्या आणि त्या घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर स्वारगेट येथून पनवेलला बसने गेल्या. पनवेल येथून दुसऱ्या बसने दादरला गेल्या. त्यानंतर रेल्वेने सीएसटी रेल्वेस्टेशनला गेल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.