भुलेश्वर -पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी येथील पोलीस पाटील पोपट इंदलकर यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले आहे. पुरंदर तालुक्याचा पूर्व भागं वर्षानुवर्षे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात आहे. मात्र पुरंदर उपसा सिंचन योजना या भागाला वरदान ठरली आहे. या योजनेने पुरंदरची दुष्काळी पुरंदर ही ओळख पुसून टाकली आहे. दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
शुक्रवारी (दि. 10) इंदलकर यांच्या शेतात त्यांचा मुलगा ऊसाला पाणी देत असताना त्याला ऊसात बिबट्या असल्याचे दिसले. यावेळी त्याने परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून हा प्राणी बिबट्या असल्याची खात्री केली. भुलेश्वर वन उद्यानातील वनकर्मचारी काळूराम शेंडगे यांना बिबट्या असल्याचे कळवले त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत खबर देऊन लगेच घटनास्थळी भेट दिली.
वनरक्षक गणेश पवार व वनपाल युवराज पाचरणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पायांचे ठसे पाहून बिबट्या असल्याची खात्री केली. या बिबट्याला पकडण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण झिंजूरके, दादा झिंजुरके, पोलीस पाटील पोपट इंदलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
याआधी बिबट्याचे वास्तव्य जिल्ह्याच्या उत्तर भागात होते; मात्र त्याचा वावर आता जिल्ह्याच्या दक्षिण भागातही वाढू लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
या बिबट्याचे वय दीड ते दोन वर्षे असून परिसरातील नागरिकांनी शक्यतो रात्रीच्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणे टाळावे. शेतात जाण्यापूर्वी फटाके वाजवावेत पुन्हा बिबट्या दिसल्यास वन विभागाशी संपर्क करा.
-युवराज पाचरणे वनपाल