मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे. फडणवीस यांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा काळा धंदा होत असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत असून या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. अशातच आता नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. यावेळी मलिकांच्या निशाण्यावर मिस्टर अँन्ड मिसेस फडणवीस असल्याचे पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली असून अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दुसरीकडे, जयदीप राणाचा फोटो आज नवाब मलिक यांनी ट्वीट केला. जयदीप राणाचा हा फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचा होता. अमृता फडणवीस यांनी एक रिव्हर अँथम गायलेले होते.
नदी संरक्षणासाठीचे हे गाणे होते. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकलेले होते. याच गाण्याचा फायनांसर हा जयदीप राणा होता, अशी माहिती नवाब मलिकांनी दिली.
नीरज गुंडे नामक व्यक्तीचे नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील “वाझे’ होते. ज्याला फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा.
देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत. त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला आहे. हलदर हे समीर दाऊद वानखेडे यांची भेट घेऊन मीडिया ट्रायल करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला कशाची घाई झाली आहे? असा सवाल करतानाच राष्ट्रपतींकडे या सर्व प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.