वाघोलीतील महापालिका कार्यालय परिसरात अंत्यविधी करणार

शिवसैनिक सागर गोरे यांचा इशारा ; अंत्यविधी करण्यापूर्वी नागरिकांची होतेय हेळसांड

वाघोली : वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर अद्यापही वाघोली येथील कार्यालयात जन्म मृत्यू नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याने व अंत्यविधी करण्यापूर्वी मयत प्रमाणपत्र मिळत नसल्याने वाघोलीतील नागरिकांची हेळसांड होत आहे.

यापुढे मृत व्यक्तीस मयत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाला तर वाघोली महापालिका कार्यालयाच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा वाघोलीचे शिवसैनिक सागर गोरे यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्तांकडे सागर गोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, वाघोलीचा नुकताच पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश झालेला आहे तरी गावामध्ये अद्याप शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या नसून नागरिकांची हेळसांड होत आहे. 

प्रामुख्याने वाघोली येथील महानगर पालिका कार्यालयामध्ये जन्म-मृत्यु नोंदणी साठीचे कामकाज सुरु करण्यात आले  नसल्याने परिसरातील एखाद्या नागरिकाचा घरामध्ये मृत्यु झाला तर त्याचा अंत्यसंस्कार करणे साठी त्याची नोंद होणे आवश्यक असते व ती नोंद करणेसाठी जर संबंधित अधिकारीच नसेल तर त्या नागरिकाचा अंत्यविधी कसा करणार हा मोठा प्रश्न नातेवाईकांना पडत आहे.

वाघेश्वरनगर येथील मागील दोन दिवसापूर्वी  एका नागरिकाचा सकाळी ११ वाजता घरी मृत्य झाला होता. त्याचा घरात मृत्यू झाल्याने परिसरातील डॉक्टर दाखला देण्यास नकार देत होते, रात्री ११ वाजेपर्यंत मृतदेह तसाच पडून होता. वाघोली पालिका कार्यालयामध्ये गेले असता त्याठिकाणी अधिकारी नाही म्हणून सांगण्यात आले. 

त्यामुळे अंत्यविधी करण्यास विलंब झाला. येणाऱ्या पुढील काळामध्ये वाघोलीत मृत व्यक्तीस मयत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाला तर मृतदेह वाघोली महानगर पालिका कार्यालयाच्या आवारात आणून अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा गोरे यांनी दिला आहे.  लवकरात लवकर वाघोली येथील महानगर पालिका कार्यालामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.