पुणे – रेणू शर्मा यांनी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. पुणे विभागाच्या त्या पहिल्या महिला “डीआरएम’ आहेत. मिलिंद देऊस्कर यांच्याकडून शर्मा यांनी पदभार स्वीकारला.
शर्मा भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या (आयआरपीएस) 1990 बॅचच्या अधिकारी आहेत. पुणे विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या आरडीएसओ, लखनौ येथे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. रेल्वे सेवेमध्ये त्यांनी पूर्वोत्तर रेल्वे, उत्तर रेल्वे, पूर्व रेल्वे, मॉडर्न रेल कोच फॅक्टरी, रायबरेली आणि आरडीएसओ लखनौ येथे विविध पदे भूषविली आहेत. मानव संसाधन (एचआर) संबंधित कामांचे संगणकीकरण करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायबरेली येथे नव्याने स्थापित झालेल्या आधुनिक कोच फॅक्टरीत मनुष्यबळाचा वापर प्रभावीपणे अंमलात आणला गेला.
पुणे विभागामध्ये रेल्वे गाड्यांचे संचलन सुरक्षित आणि वेळेवर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न आहे. यासह स्थानक परिसरात चांगल्या सुविधा, गाड्यांची सुरळीत वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्न राहील.
– रेणू शर्मा, रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग