अभिनेत्री अंकिता लोखंडेचा “बागी-3 ‘ या दुसऱ्या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. “मणिकर्णिके’प्रमाणेच याही चित्रपटात अंकिता एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
यानिमित्ताने तिच्याशी बातचीत केली असता अंकिता भरभरून बोलली. ती म्हणते, मी आजवर कधीही माझी हिंमत आणि मेहनत या दोन्ही गोष्टी कधीही कमी केल्या नाहीत.
मला केवळ एवढेच माहीत आहे की मी एक नायिका आहे आणि अभिनय हेच माझे काम आहे. आजघडीला तरी मी एखाद्या भूमिकेसाठी हट्टीपणा दाखवू शकत नाही. “माणिकर्णिका’मुळे मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे चांगल्या व्यक्तिरेखा ज्या-ज्या येतील त्या स्वीकारून त्यामध्ये मी झोकून देन काम करत आहे.
अंकिता सांगते, अनेकदा माझ्या खासगी आणि सिनेकरिअरविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. करिअरबाबत तर माझ्यासोबत नेहमीच पक्षपात केला जातो, पण तरीही मी कधीही नखरे दाखवत नाही. किंबहुना, मी कसलीही शेरेबाजी, आकांडतांडवही करत नाही. कारण मला बॉलीवूडच्या कोणत्याही गेम प्लॅनमध्ये अडकायचेच नाहीये.
अंकिताचा “पवित्र रिश्ता’मधील अभिनय प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. आजही तिच्याकडे टीव्ही मालिकांसाठी विचारणा होते. “बिग बॉस 13’ च्या शोमध्ये गेस्ट म्हणून जाणे तिला मनापासून आवडते. अंकिता म्हणते, मागील काळात जे घडले ते घडले! ती एक फेज होती. पण आता मात्र मी सर्व ध्यान चित्रपटांकडे वळवले आहे.