वुहान : एकीकडे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना चीनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात सर्वात आधी चीनमध्ये झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनमध्ये हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.
जगात आतापर्यंत एकूण दोन लाख 19 हजार नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर 9000 नागरिक यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. चीनमध्ये बुधवारी रात्रीपर्यंत 34 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीतून दिसले. पण हे सर्व नागरिक परदेशातून चीनमध्ये आले आहेत. परदेशात असतानाच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. चीनमध्ये असलेल्या कोणत्याही नागरिकाला नव्याने कोरोना झाल्याचे बुधवारी रात्री संपलेल्या 24 तासांत आढळून आलेले नाही.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि उपचार सुरू असलेल्या 8 जणांचा बुधवारी चीनमध्ये मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू वुहान प्रांतातच झाले आहेत. पण बुधवारी वुहानमध्ये कोणत्याही नागरिकाला नव्याने कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.