विनाकारण गर्दी करू नका : शिक्षण आयुक्तांचे आदेश जारी
राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत राज्यातील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागतांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात फिरकू नये. या कार्यालयात कोणत्याही बैठका आयोजित होणार नाहीत. आवश्कता वाटल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स, ई-मेल, दुरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येईल, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जारी केले आहेत.
सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली आहे. करोनाचा प्रसार टाळण्याच्या दृष्टीने शासनाने राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतूदीनुसार अधिसूचनाही जारी केल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार शिक्षण आयुक्तालयाने उपाययोजना लागू केल्या आहेत.
करोना विषाणूचा प्रभाव कमी होईपर्यंत अथवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शिक्षण आयुक्तालयात क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार नाहीत. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचे व तातडीने काम असल्यास पूर्वपरवानगी घेऊनच शिक्षण आयुक्तालयात यावे व अधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिल्या आहेत.
कार्यालयातील गर्दीचा विचार करता अभ्यागतांनी त्यांच्या व शिक्षण आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दैनंदिन कामासाठी कार्यालयात येण्याचे टाळावे. अतिमहत्त्वाचे व तातडीचे काम असल्यास प्रथम दुरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे शिक्षण आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायकांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे.
अभ्यागतांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटू नये, अशा सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी जारी केल्या आहेत. मात्र, तरीही काही मंडळी कार्यालयात येऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवत असल्याचे आढळून येत आहे.