राजगुरुनगर -शहरालगत असलेल्या राक्षेवाडी येथे एका 40 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असून खेड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्ण हा पुणे येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. तो दिवसाआड पुणे येथे कामास जात होता. 12 मे रोजी त्याला ताप आल्यामुळे तो राजगुरूनगरला खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. येथे बरे न वाटल्याने हा रुग्ण पीएमपी बसने पुण्याला गेला.
सोमवारी (दि. 13) तो ऍडमिट झाला. त्याची करोना स्वॅब चाचणी केली असता तो करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित रुग्णाची पत्नी व दोन लहान मुलास खबरदारी म्हणून स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्कॉरटांइन करण्यात आले आहे.
राक्षेवाडी येथे करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती समजताच पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी खबरदारी घेत या ठिकाणी असलेल्या नागरिकांना सूचना देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
संबंधित व्यक्ती, राहण्याचे ठिकाण आदी माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने करोना भीतीमध्ये वाढ झाली आहे. खबरदारी म्हणून या परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. परिसर सील करण्याचे काम सुरू झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तरी नागरिकांची शहरात विविध वस्तू भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. नागरिकांनी आतातरी सजग बनावे करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रुग्णाची पत्नी जात असलेली कंपनी बंद
संबंधित रुग्णाची पत्नी सेझमधील निमगाव (ता. खेड) येथे एका कंपनीत कामाला होती. खबरदारी म्हणून या कंपनीचे युनिट बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील 29 महिलांना क्कॉरंटाइन करण्यात आले आहे.