– संजोग काळदंते
ओतूर – विधानसभा निवडणुकीत जुन्नर मतदारसंघात 2014मध्ये एकमेकांविरोधात लढलेले चेहरेच पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकणार आहेत. बदल असणार तो केवळ पक्षचिन्हांचा! युती होणार असल्याचे जवळपास निश्चित असून, आघाडीचे घोडे गंगेत न्हाले आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांची संख्या मात्र कमी असेल.
हो नाही करता करता आघाडीत जुन्नरची जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवली आहे. या जागेवर सर्वानुमते पक्षाने ठरवलेले उमेदवार अतुल बेनके हेच रिंगणात उतरतील. शिवसेनेकडून शरद सोनवणे यांची उमेदवारी फिक्स आहे. मागील वेळी भाजपकडून लढलेले नेताजी डोके यावेळी शिवसेनेसोबत आहेत. तर सेनेच्याच निष्ठावंत; परंतु लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातून हकालपट्टी झालेल्या नेत्या आशा बुचके या निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन लढण्याच्या तयारीत आहेत.
ऐतिहासिक वारसा असलेला जुन्नर तालुका राजकारणातही कमी नाही. निवृत्तीशेठ शेरकर यांच्यासारखे खासदार या तालुक्याने दिल्लीत पाठविले. निवृत्तीशेठ शेरकर यांचा सहकारावर मोठा पगडा होता. तालुक्याचे माजी आमदार श्रीकृष्ण (झांबरशेठ) तांबे यांनी नगर-कल्याण माळशेज घाटासाठी मोठे प्रयत्न केले होते. तसेच मातोश्रीवर मोठे वजन असणारे बाळासाहेब दांगट यांनीही तालुक्यात जलक्रांतीसाठी मोठे प्रयत्न केले. वल्लभ बनके यांनी त्यांच्या आमदारकी काळामध्ये कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी काही कमी पडू दिले नाही. तर सध्याचे आमदार शरद सोनवणे यांनी पाच वर्षांत तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले.
एकंदरीत शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अतुल बेनके, कॉंग्रेसचे सत्यशील शेरकर, अपक्ष म्हणून असणाऱ्या आशा बुचके या उमेदवारांची मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्या पक्षाचे कोणाला तिकीट मिळेल. आघाडी तर नक्की आहे. सेना-भाजप युती होईल की तुटेल हे मात्र अनुत्तरितच आहे. आता जुन्नर तालुक्यातील माय बाप जनता कोणाला आमदार करणार हे येणारा काळच सांगेल.
अतुल बेनके “युवकांचे आशास्थान’
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांना यावेळी पक्षातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. कॉंग्रेसनेही यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळयचे ठरवले आहे. त्यामुळे यावेळी आमदारकीसायाठी त्यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. मागील आठवड्यात त्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय नगरला हलवल्यामुळे आळेफाटा येथे आंदोलन केले. याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास प्रचंड गर्दी जमल्याने अतुल बेनके यांना मिळणारा पाठिंबा अधिकच असल्याचे अधोरखित झाले आहे. त्यांच्या या आंदोलनाला यश देखील मिळाले.
शरद सोनवणे “आपला माणूस’
2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि एका ध्येयवेड्या तरुणाने या तालुक्याचा कायापालट केलेला दिसतो आहे. पूर्वी शिवसेनेतच असलेले शरद सोनवणे यांनी आपणास तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्याने 2014मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला व आपल्या प्रचाराला सुरुवात केली. मनसेच एकमेव आमदार म्हणून ते निवडूनही आले. पाच वर्षांच्या कार्यकाळीत त्यांनी तालुक्यात “आपला माणूस’ म्हणून प्रतिमा निर्माण केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी आमदार सोनवणे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आणि शिवसेनेतून उमेदवारीचा शब्द देण्यात आला.
आशा बुचके “लढवय्या नेत्या’
शिवसेनेमध्येच इच्छुक असणाऱ्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली तरी त्यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे त्यांनी सुरू ठेवले असून मिळावे घेताना त्या दिसत आहेत. महिलांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. काही निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचाही बुचके यांना छुपा पाठिंबा आल्याचे बोलले जाते. बुचके यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. त्या अपक्ष लढाईची तयारी करीत आहेत की निवडणुकीच्या तोंडावर कुठल्या पक्षात जाणार? हे मात्र येणारा काळच सांगेल.
शिवसेनेमध्येच इच्छुक असणाऱ्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली तरी त्यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे त्यांनी सुरू ठेवले असून मिळावे घेताना त्या दिसत आहेत. महिलांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. काही निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचाही बुचके यांना छुपा पाठिंबा आल्याचे बोलले जाते. बुचके यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. त्या अपक्ष लढाईची तयारी करीत आहेत की निवडणुकीच्या तोंडावर कुठल्या पक्षात जाणार? हे मात्र येणारा काळच सांगेल.