ब्रुसेल्स- युरोपिय संघातील सदस्य देशांमध्ये अनावश्यक प्रवासावर घालण्यात आलेले निर्बंध 1 जुलैपासून शिथिल केले जातील, असे युरोपिय संघाच्यावतीने गुरुवारी जाहीर करण्यात आले. युरोपिय संघातील सदस्य देशांमध्येच राहणारे विदेशी विद्यार्थी, युरोपिय संघाबाहेरील देशातील रहिवासी आणि उच्च कौशल्य असलेले कामगार यांना 1 जुलैपासून या निर्बंधांमधून वगळण्यात येणार आहे.
मार्च महिन्यात युरोपात करोनाची साथ झपाट्याने पसरायला लागली होती. तेंव्हा युरोपिय संघाने प्रवासी निर्बंधांची व्याप्ती सर्व युरोपभर वाढवली. संघटनेचे सदस्य देश असलेल्या सर्व 27 देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्यात यावा, असे निर्बंधही घालण्यात आले होते. या सदस्य देशांबरोबरच आईसलॅन्ड, लिचटेन्स्टेन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या देशांमध्येही 15 जूनपर्यंत अनावश्यक प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
युरोपिय देशांतर्गत ओळखपत्राशिवाय प्रवासाची सुविधाही जून अखेरपर्यंत सुरू केली जाणार आहे. अर्थकारणाला वेग देण्यासाठी आणि विशेषतः पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी युरोपिय संघाबाहेरील देशांसाठीच्या सीमाही खुल्या करण्याची शिफारस युरोपिय संघाच्या कार्यकारी आयोगाने केली आहे.