लंडन – बळजबरीने केले जाणारे धर्मांतर आणि हिंदू तरुणींचा मुस्लिम युवकांबरोबर निकाह लावून देण्याचा आरोप असेलेल्या मुस्लिम धर्मगुरुवर ब्रिटनने निर्बंध घातले आहेत. याशिवाय मानवी हक्क उल्लंघन आणि भ्रष्टाचार प्रकरणी अन्य 30 जणांवरही निर्बंध घातले गेले आहेत.
ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्बंध घातलेल्या व्यक्तींच्या नवीन यादीमध्ये सिंध प्रांतातील घोटकी येथील भारचुंडी शरीफ श्रद्धास्थानाचे पदाधिकारी मियान अब्दुल हक यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन आणि मानवी हक्क दिनाच्या औचित्याने ही नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये तुरुंगातील कैद्यांचा छळ करणारे, सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचा करणारे लष्करातील अधिकारी आणि नियोजनपूर्वक अत्याचार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. जगभर खुले आणि मुक्त सामाजिक वातावरणाला प्रोत्साहन देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार या सर्वांवर निर्बंध घातले गेले आहेत, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी म्हटले आहे.
हक हे सिंध प्रांतातील प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय नेते आहेत. हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याचा त्यांच्यावर अनेक वर्षांपासून आरोप होतो आहे. ते बिगर मुस्लिम आणि अल्पसंख्य समाजातील मुलींचे धर्मांतर आणि मुस्लिमांशी निकाह लावून देत असतात.
Loksabha : अधिररंजन चौधरींचे लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र, म्हणाले “नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे…”
ब्रिटनने घातलेल्या निर्बंधांच्या यादीतील व्यक्ती आणि संस्थांची ब्रिटनमदील मालमत्ता जप्त केली जाणार आहे. तसेच या सर्वांना ब्रिटनमध्ये प्रवास करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. याशिवाय या व्यक्तींशी संबंधित संस्ता आणि व्यवसायांशीही ब्रिटनमधील व्यक्तीला कोणताही आर्थिक व्यवहार केले जाऊ शकणार नाहीत.