20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान पाणी गोवा इथं सुवर्ण महोत्सवी असा 50 वा इफ्फी मोठ्या दिमाखात पार पडला. 76 देशांमधील 200 सर्वोत्तम चित्रपट यंदा प्रेक्षकांना पाहायला मिळाले. शिवाय यावेळी इफ्फीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. त्यासोबतच स्त्री शक्तीचा जागर करणारे काही चित्रपट इफ्फीमध्ये पाहायला मिळाले त्याविषयी…
50 व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते एकत्र आले होते. सुपरस्टार रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चन. रजनीकांत यांना “आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे हा पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तर्फे देण्यात आला. यामुळेच उद्घाटन सोहळ्याला चार चांद लागले असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
यंदा इफ्फीमधील काही चित्रपटांमधून एक अनोखा असा स्त्री शक्तीचा जागर पाहायला मिळाला. “उयारे’ या मल्याळम चित्रपटातील प्रमुख पात्र पल्लवी, मॅसिडोनिया या देशातील चित्रपट “गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ या चित्रपटातील बोल्ड, बिनधास्त अशी पेट्रूनिया आणि फीलिंग्स टू टेल या चीनमधील चित्रपटाची दिग्दर्शिका वेन ली या तिघींच्या रूपात एक अनोखा स्त्री शक्तीचा जागर यंदा इफ्फीमध्ये अनुभवायला मिळाला.
ऍसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तीची कथा सांगणारा “उयारे’
इंडियन पॅनोरमा विभागात “उयारे’ हा मल्याळम चित्रपट यावेळी प्रदर्शित झाला. पल्लवी ही केरळमधील एका मध्यमवयीन घरातील तरुणी. लहानपणी पाहिलेलं पायलट होण्याचं स्वप्न ती प्रत्यक्षात आणत असते. दरम्यान गोविंद नावाच्या एका तरुणाशी तिची मैत्री होते. पुढे जाऊन ते दोघे लग्न सुद्धा करणार असतात. परंतु संशयी स्वभावाच्या गोविंदला एका प्रसंगी पल्लवी नकार देते. त्यानंतर गोविंद तिच्यावर ऍसिड फेकतो. प्रोफेशनल पायलटचे ट्रेनिंग पूर्ण झालेली पल्लवी या ऍसिड हल्ल्यामुळे पूर्णपणे ढासळते. तिचा अर्धा चेहरा जळालेल्या अवस्थेत असतो. पूर्ण बरे झाल्यावर एक घटना तिचं आयुष्य बदलून टाकते. पल्लवीला एअर होस्टेसची नोकरी मिळते. या दरम्यान एक दिवस विमानातील प्रमुख पायलट अटॅक आल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. परंतु प्रोफेशनल पायलटचे ट्रेनिंग घेतलेली पल्लवी न डगमगता ते विमान सुखरूपपणे जमिनीवर घेऊन येते. यामुळे पल्लवीमधील आत्मविश्वास चांगलाच वाढतो. आजच्या तरुणाईसाठी प्रेरणा देणारी अशी पल्लवी आपल्या चांगलीच लक्षात राहते. तुम्ही एखादी गोष्ट ठरवलीत तर नेमकं काय होऊ शकतं हे हा चित्रपट पाहिल्यानंतर कळतं.
बोल्ड आणि बिनधास्त अशी पेट्रूनिया
मॅसिडोनिया या देशातील चित्रपट “गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ चित्रपट हा पेट्रूनिया या 32 वर्षीय तरुणीच्या आयुष्यावर बेतलेला आहे. पेट्रूनिया ही तब्बेतीने थोडी जाड असल्याने तिचं लग्न ठरण्यात अडथळे येत आहेत. शिवाय इतिहास विषयात पदवी धारण केलेल्या पेट्रूनियाला अजूनपर्यंत कुठेही नोकरी मिळालेली नाही. बेरोजगारीचे एक कारण म्हणजे तिची तब्बेत. या सगळ्यामुळे ती प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेली असते. पेट्रूनिया ज्या ठिकाणी राहत असते, त्या ठिकाणी एके दिवशी धार्मिक कार्यक्रम असतो. ज्यामध्ये चर्चचे फादर एका पुलावरून छोटा लाकडी क्रॉस वाहत्या नदीत टाकतात आणि खाली उभे असलेले पुरुष तो क्रॉस शोधतात. जो तो क्रॉस शोधेन त्याला तिथं सन्मान मिळतो. पेट्रूनियाला नेमकी ही प्रथा माहिती असते. ती पुलाखाली जाऊन थांबते आणि जेव्हा फादर क्रॉस नदीत फेकतात तेव्हा ती सुद्धा नदीत उडी मारते आणि सर्व पुरुषांच्या नाकावर टिच्चून क्रॉस मिळवते. एका मुलीने तो क्रॉस मिळवला हे तिथं जमलेल्या पुरुषांना आवडत नाही. ते पेट्रूनियाला विरोध करतात. दरम्यान पेट्रूनिया तिथून क्रॉस घेऊन घरी पळून जाते. त्या ठिकाणी जमलेल्या काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ काढलेला असतो, तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यानंतर पोलीस पेट्रूनियाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. तो क्रॉस पेट्रूनियाने चर्चला देऊन टाकावा यासाठी तिची मनधरणी करतात. पण एकूणच पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात पेटून उठलेली पेट्रूनिया त्यांना अजिबात जुमानत नाही. सरते शेवटी पेट्रूनियाचाच विजय होतो. तिला तिची काळजी घेणारा असा भविष्यातील जोडीदारसुद्धा तिथंच पोलीस स्टेशनला भेटतो. अगदी शेवटी पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर पेट्रूनिया तो क्रॉस परत देऊन टाकते. आणि तिथून अगदी जबरदस्त अशा आत्मविश्वासाने तिच्या घरी जाते. हा चित्रपट पाहण्यापूर्वी ही माहिती कळली होती की या चित्रपटाला जगभरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये 20 हून जास्त बक्षिसे मिळाली आहेत. ही सर्व बक्षिसं हा चित्रपट नक्कीच डिझर्व्ह करतो.
आपल्या आजीला चित्रपट समर्पित करणारी दिग्दर्शिका वेन ली चीनमधील एक समाज आजही निसर्गाचा आदर राखतो. निसर्गात राहून निसर्गाचा सन्मान करतो. याबाबत सुंदर अशा छायाचित्रणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न चीनची दिग्दर्शिका वेन ली हिने तिच्या “फीलिंग टू टेल’ या चित्रपटाद्वारे केला आहे. शहरातील एक तरुण चित्रकार चीनमधील एका अशा निसर्ग रम्य भागात जातो जिथं अजूनपर्यंत जास्त कुणी गेलेलं नाहीये. तो चित्रकार तिथे एका व्यक्तीला भेटतो. ही व्यक्ती एका अशा समाजातून आहे जो समाज आजही विविध प्रथांमधून निसर्गाचा आदर ठेवतो आहे. तो चित्रकार तिथं राहतो. विविध ऋतूंमध्ये तो चित्रकार त्या व्यक्तीसोबत राहतो. दरम्यान त्या व्यक्तीच्या मुलीसोबत या तरुणाची ओळख होते. ती मुलगी त्यांच्या समाजातील विविध प्रथा सादर करत असते. तो चित्रकार तरुण त्या मुलीला शहरात येण्याविषयी विचारतो. पण समाजापुढे त्या मुलीचं काहीच चालत नाही.
एकूणच खूप साधी अशी कथा या चित्रपटाची आहे.
चित्रपटाचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे सुरेख असं छायाचित्रण. चीनमधील सुंदर अशा नद्या, डोंगर असलेल्या भाग या चित्रपटात दाखवला आहे. हा सुंदर निसर्ग हे या चित्रपटाचे एक पात्रच आहे असं म्हटल्यास हरकत नाही. एक छानशी व्हिज्युअल ट्रीट पाहायला मिळाली, असं आपण हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच म्हणू शकतो. शिवाय त्यालाच साजेसं असं पार्श्वसंगीत चित्रपटात वापरलं गेलं आहे. इफ्फी 2019 मध्ये सोल ऑफ एशिया या विभागात चीनमधील “फीलिंग टू टेल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शिका वेन ली ही स्वतः यावेळी उपस्थित होती. हा चित्रपट तिने तिच्या आजीला समर्पित केला असल्याचं यावेळी सांगितलं.
“उयारे’ चित्रपटातील पल्लवी, “गॉड एक्झिट्स, हर नेम इज पेट्रूनिया’ मधील पेट्रूनिया आणि “फीलिंग्स टू टेल’ या चित्रपटाची दिग्दर्शिका वेन ली या तिघींच्या रूपात एक अनोखा असं स्त्री शक्तीचा जागर अनुभवायला मिळाला. एकुणातच 50 वा इफ्फी दरवर्षी प्रमाणेच दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची सुरेख अशी मेजवानी घेऊन आला होता. यंदाच्या इफ्फीमुळे हे आणखी एकदा सिद्ध झाले की इफ्फी म्हणजे दर्जेदार चित्रपटांसाठीचे महत्त्वपूर्ण असे व्यासपीठ आहे.
– अमोल कचरे