लिफ्टमध्ये अडकलेला तरुण पावणेदोन तासांनी सुटला
पालिकेच्या नवीन इमारतीमधील धक्कादायक प्रकार
आयुक्तांच्या लिफ्टमनने प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्राण
पुणे – महापालिकेने तब्बल 55 कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारलेली विस्तारित इमारत शनिवारी पुन्हा चर्चेत आली. लिफ्टमध्ये 25 वर्षीय तरुण तब्बल दोन तास अडकून होता. लिफ्ट अचानक बंद पडल्याने आणि आरडा-ओरडा करूनही आवाज बाहेर जात नसल्याने तरुण अक्षरश: गुदमरून गेला होता. तर, कोणीतरी लिफ्टमध्ये अडकल्याचा संशय एका नागरिकाला आल्याने त्याने ही माहिती सुरक्षा विभागास दिली. त्यावर जुन्या इमारतीतील आयुक्तांचा लिफ्टमन दीपक थोपटे याने प्रसंगावधान राखत लिफ्ट पुन्हा सुरू करून तरुणाची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. घाबरलेला हा तरुण तातडीने बाहेर पडल्याने त्याच्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा तरुण आरोग्य विभाग आणि नवीन सभागृहाला जोडणाऱ्या पुलावरून विस्तारित इमारतीच्या पुलाजवळील लिफ्टमध्ये आला. त्याला खाली जायचे असल्याने त्याने लिफ्ट सुरू केली. मात्र, त्याच वेळी यंत्रणा स्ट्रीप झाल्याने तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मध्यभागीची ही लिफ्ट बंद पडली. त्यामुळे हा तरुण अडकून पडला. तर, शनिवारमुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काहीच वर्दळ नव्हती. दुसऱ्या मजल्याच्या दरवाजाआधीच लिफ्ट बंद पडल्याने त्याचा आवाज कोणालाही जात नव्हता. त्यातच लिफ्टमधील अलार्म तसेच इतर यंत्रणाही विद्युत प्रवाह खंडित झाल्याने बंद होती. त्यामुळे तो दरवाजावर लाथा मारत तसेच ओरडत होता. पावणेदोनच्या सुमारास एका नागरिकाने सुरक्षा रक्षकांना ही माहिती कळवली. त्यावेळी थोपटे यांनी तातडीने विस्तारित इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कंट्रोल रुममध्ये जाऊन लिफ्टचे स्विच तपासले. त्यावर एक स्विच ट्रिप झाल्याचे दिसताच लगेच तो स्विच सुरू केला.
त्यानंतर लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर येऊन पुन्हा तिसऱ्या मजल्यावर गेली. यावेळी हा तरुण महापौर कार्यालयाबाजूला पळत जात आपण लिफ्टमधून सुटल्याचे कोणाला तरी सांगत होता. त्यावेळी थोपटे यांनी “आत तूच होताच का’ असे विचारले तेव्हा. “मीच दोन तासांपासून अडकलो होतो,’ असे सांगत हा तरुण घाबरत निघून गेल्याचे थोपटे यांनी “प्रभात’ला सांगितले.
लिफ्टची सुरक्षा ऐरणीवर
या इमारतीत तब्बल 6 ते 8 कोटींचा खर्च करुन या लिफ्ट उभारलेल्या आहेत. तर, याची देखभाल आणि त्या चालवण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे आहे. मात्र, या इमारतीत जवळपास सहा लिफ्ट असून त्यातील केवळ महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे जाणारी एकच लिफ्ट दररोज सुरू असते. इतर लिफ्ट मात्र केव्हाही सुरू असतात. एकाही लिफ्टला लिफ्टमन नाही. त्यामुळे आणीबाणी उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. संबंधित घटनेत अडकलेल्या तरुणाचा आवाज कोणीही ऐकला नसता, तर रविवारी महापालिकेस सुट्टी होती. तसेच इमारतीत मोबाइल नेटवर्कचीही समस्या आहे. त्यामुळे हा तरूण बेशुद्ध झाला असता, तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे आता ढिसाळ नियोजनामुळे लिफ्ट तसेच नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर आपत्कालिन परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे.