वीज बिल माफीचे बोललोच नव्हतो; उर्जामंत्री राऊत यांचा दावा

नागपूर – 100 युनिट वीज बिल माफी देणार असे आपण सांगितलेच नव्हते, असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. तसेच 100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असे आपण सांगितले होते. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झाले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी आपण राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अद्यापही ठाम असल्याचे वक्तव्य 20 नोव्हेंबर 2020 रोजी केले होते. त्यावेळी आधी मागच्या सरकारच्या पापाचे निरसन करु, मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते.

चालू वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसांची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये वीजेचा वापर केला नसतानाही मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावरुन वीज बिल भरु नका असे आवाहन विरोधकांकडून करण्यात आले आहे. वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपने आंदोलनही केले आहे. असे असले तरी बिल भरावेच लागणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीचा शपथविधी शेतकऱ्यांच्या साक्षीने झाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपचे वीज बिल आंदोलन फसवे आहे. इंधन दरवाढ, धान्य दरवाढ होत आहे. अशावेळी 10 महिने वीज बिल भरले नाही तर महावितरण जगणार कशी? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. वीजनिर्मितीसाठी पैसे लागतात. त्यामुळे जनतेने वीज बिल भरावे, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.