नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त, लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. त्या राज्यातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल हे ८ जानेवारीला संध्याकाळी आंध्र प्रदेशात पोहचतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वीच्या योजनेनुसार, निवडणूक आयोगाचे आयुक्त ७ ते १० जानेवारी दरम्यान तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला भेट देणार होते. त्या दौऱ्यात सुधारणा करण्यात आली आहे.आंध्रप्रदेशच्या दौऱ्यानंतर ही समिती तामिळनाडुच्या दौऱ्यावर जाणार आहे. या आधीच उपनिवडणूक आयुक्त आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देशातल्या सर्व राज्यांचा दौरा करून पहाणी केली आहे.
राजकीय पक्ष, वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि मैदानावरील मतदान यंत्रणा यांच्याशी थेट चर्चा करून माहिती घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त नेहमीच असा दौरा करीत असतात. ते सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट देतील की नाही हे अद्याप निश्चित नाही. ज्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या त्या राज्यांना ते वगळू शकतात.
२०१९ मध्ये, लोकसभेच्या निवडणुका १० मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या आणि ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यांत निवडणुका घेतल्या गेल्या. २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.