शैक्षणिक संस्था अजूनही “पवित्र’पासून वंचित

पहिले सत्र संपल्यानंतरही शिक्षक मिळेनात : शिक्षकांसाठी संस्थांचे शासनाला साकडे
पिंपरी (प्रतिनिधी) – शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. विविध खासगी संस्थांच्या शाळेवर या भरतीमधूनच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक देण्यात येणार होते. मात्र, विद्यार्थ्यांचे या वर्षातील पहिले शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही अद्याप शैक्षणिक संस्थाच्या शाळांना शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे, खासगी संस्थाच्या शाळा अजूनही पवित्र पोर्टलच्या सुविधेपासून वंचितच राहिल्या आहेत. लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करुन द्यावे, असे साकडे संस्थाचालक शासनाकडे घालत असल्याचे दिसत आहेत.

डिसेंबर 2017 साली झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे, शिक्षक भरती प्रक्रियेला सुमारे दोन वर्ष होऊनही अद्यापही अनेक संस्थाचालकांना शिक्षक मिळालेले नाहीत. या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची नियुक्ती केली जाणार होती. मुलाखत व मुलाखती शिवाय शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार होती. मागील काही दिवसांपूर्वी मुलाखती शिवाय निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. महापालिका शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

मात्र, खासगी संस्थाची निवड यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पूर्वी, निवड झालेल्या यादीत घोळ असल्याने तो सुटल्याशिवाय खासगी संस्थाची यादी जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, आता अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी खाजगी संस्थाच्या शाळेमध्ये अद्याप नविन शिक्षक मिळालेले नाहीत. पर्यायाने खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे रखडलेली ही शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळवे व खासगी शाळेंना लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान
शाळांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून संस्थाचालकाकडून होत आहे. तरीही अद्याप शिक्षकांचा पत्ता नाही. संस्थाचालकांनी शिक्षक भरले तर त्यांचे वेतन कोण देणार? यासह अनेक प्रश्‍नांना सध्या संस्थाचालकांना सामोरे जावे लागत आहे. ही शिक्षक भरती 2017 सालापासून रखडलेली असल्याने 2018 व 2019 मध्येही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे, रखडलेली शिक्षक भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी खासगी संस्थाचालकांकडून होऊ लागली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×