पिंपरी चिंचवड शहर विकासात नितीन देसाई यांचे योगदान ! निवृत्त सह शहर अभियंता तुपे यांनी जागवल्या आठवणी

पिंपरी – औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे उल्लेखनीय असे योगदान आहे. देसाई यांनी भक्ती-शक्ती उड्डाणपूलावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि बर्ड व्हॅली उद्यानातील लेजर शो साठी थीम आर्ट डिरेक्टर म्हणून योगदान दिल्याच्या आठवणी पालिकेचे निवृत्त सह शहर अभियंता प्रविण तुपे यांनी जागविल्या आहेत.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी (दि.2) दुपारी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. देसाई यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील दोन प्रकल्पातील योगदानाबद्दल माहिती देताना तुपे म्हणाले, शहराच्या प्रवेशव्दारावर म्हणजे निगडी येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या रोषणासाठी देसाई यांचा पालिकेने सल्ला घेतला होता. त्याचबरोबर संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील लेजर शो साठी थीम आर्ट डिरेक्टर म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. या कामासाठी देसाई यांची दोन-तीन वेळा संपर्क आला. देसाई हे कामासाठी सदैव तत्पर असत. त्यांनी पालिकेच्या 2019 मध्ये झालेल्या स्वरसागर संगीत महोत्सवालाही हजेरी लावली होती. तसेच प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहालाही भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केली होती. महापालिका कलाकारांना प्रोत्साहन देत असल्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवडवर विशेष प्रेम असल्याचेही तुपे म्हणाले.





