शिवसेनेचा इशारा : खड्डयांमुळे अपघातांमध्ये वाढ
निमसाखर – बारामती- कळंब, बावडा रस्त्याची अवस्था काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. या रस्त्याचे काम खासगीकरणातू “बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या या मार्गाची अवस्था खराब झाली आहे.
दरम्यान, बीकेबीएन रस्ता हा खराब झाला असून संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरूस्ती न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंदापूर तालुका शिवसेना संघटक सुदर्शन रणवरे यांनी दिला आहे.
सध्या बारामती- कळंब बावडा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आषाढीवारीमध्ये संत सोपानकाका महाराज, श्रीसंतराज महाराज यासह अनेक लहान मोठ्या पालख्या व दिंड्या जात असतात. मात्र दुरावस्थेबद्दल कोणीही बोलत नाही. कळंब ते निमसाखर दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूकच करावी लागत आहे. संबंधित विभागाने रस्त्याची लवकर दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
बीकेबीएन रस्त्याचे काम “बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर खासगी कंपनीला देण्यात आले आहे. दोन ते तीन महिन्यांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यापूर्वी दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल.
– एस. नगरारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.