राजवडी – कालठण रस्त्याची वाट : पोटचाऱ्यांही नाहीत
रेडा – इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी ते कालठण नंबर एक हा सहा ते साडेसहा किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे. केवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने उसात साचलेले पाणी रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे.
रस्त्यासाठी निधी एक कोटींवर मंजूर झालेला असताना दर्जेदार रस्ता होत नाही. त्यामुळे त्वरित लवकर रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजवडी ते कालठण नंबर एक रस्त्याने करेवाडी, कळाशी, बनकरवाडी, गंगावळण तसेच उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयात शिकण्यासाठी परिसरातील शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. जगताप वस्ती येथील ओढ्यावरून पाणी वाहत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव जावळे व युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब धोत्रे म्हणाले की, रस्त्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी एक कोटी 83 लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु संबंधित ठेकेदारांनी रस्त्याकडील झाडे काढली आहेत. कोणतेही काम अद्यापि केले नाही. हा तात्काळ रस्ता नवीन करण्यात यावा.