लोणी काळभोर -हवेली तालुक्याच्या पूर्व भागात करोनाचा प्रादुर्भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढला असून आज एकाचदिवशी चार रूग्ण बाधित आढळले आहेत. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवार (दि. 10) पासून सलग तीन दिवसांत लोणी काळभोरसह उरुळी कांचन, कदमवाकवस्ती व ग्रामपंचायत हद्दीत रूग्णसंख्येत वाढ होते आहे. आज एकाच दिवसात चार बाधित रुग्ण आढळून आल्याने पूर्व हवेलीत पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करणाऱ्या व सध्या लोणी काळभोर येथील कोविड सेंटरमध्ये नियुक्तीवर काम करणाऱ्या एका महिला तंत्रज्ञाचा समावेश आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एक 70 वर्षीय महिला, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एका करोना बाधिताचे दोन जवळचे नातेवाईक असे चार जण करोना बाधित असल्याचे शुक्रवारी (दि. 12) निदर्शनास आले आहे. (दि. 9) उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तरुण करोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. गुरुवारी (दि. 10) कदमवाकवस्ती हद्दीत एक रुग्ण आढळुन आला.
तर आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी परिसरात 4 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्व हवेलीत वीसपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मात्र गेल्या पंधरा दिवसात एकही रुग्ण आढळून न आल्याने, पूर्व हवेलीकर बिनधास्त जीवन जगत होते; परंतु एकाच दिवसात चार रुग्ण आढळून आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. *-