पिंपरी – शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांत करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शुक्रवारी (दि. 12) दुपारपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 1095 पर्यंत पोहोचला होता. त्यामध्ये सर्वाधिक 453 रुग्ण हे 22 ते 39 या वयोगटातील आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 41.37 टक्के इतके आहे. त्यामुळे करोनाच्या विळख्यात तरुणाई कायम आहे.
तुलनेत साठपेक्षा अधिक वयोगटाचे 120 रुग्णच बाधित झाले आहेत. हे प्रमाण 10.96 टक्के इतके आहे. करोनाबाधितांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण कमी असल्याने ही बाब दिलासादायक आहे. शहरामध्ये 11 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून आत्तापर्यंत तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. करोनाबाधित रुग्ण संख्येने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे. मार्च अखेर केवळ 14 रुग्ण होते.
तर, एप्रिल महिन्यामध्ये 102 रुग्ण वाढले. तुलनेत मे महिन्यात तब्बल 449 करोनाबाधित रुग्ण वाढले. त्यामुळे मे अखेर रुग्णसंख्या 565 पर्यंत पोहोचली. तर, जून महिन्यात अवघ्या 12 दिवसांत 530 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हा आकडा आता 1095 पर्यंत पोहोचला आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या 533 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 544 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे. 18 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
चाळीशीच्या आतील 65 टक्के रुग्ण
करोनाबाधित रुग्णांमध्ये चाळीशीच्या आतील रुग्ण हे 65.20 टक्के इतके आहेत. शून्य ते 12 वयोगटातील 131 रुग्ण (11.96 टक्के), 13 ते 21 वयोगटातील 130 रुग्ण (11.87 टक्के) आणि 22 ते 39 वयोगटातील 453 रुग्ण (41.37 टक्के) आहेत. साठपेक्षा अधिक वयोगटाचे 120 रुग्ण आहेत. त्यांचे टक्केवारीतील प्रमाण 10.96 टक्के इतकेच आहे. तुलनेत 40 ते 59 वयोगटातील रुग्ण संख्या मात्र जास्त आहे. संबंधित वयोगटातील 261 रुग्ण हे आत्तापर्यंत करोनाबाधित झाले. त्यांचे प्रमाण 23.84 टक्के इतके आहे.