जुन्नर, दि. 12 (प्रतिनिधी) -जुन्नर तालुक्यातील मिन्हेर येथे दुर्मिळ वानराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना दि. 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आंबेगाव येथील एकनाथ गोपाळ आसवले (रा. फुलवडे), गणपत शिमगे हिलम (रा. धालेवाडी) यानी वानराचा पाठलाग करून गलोलच्या सहाय्याने शिकार करून, अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने त्याचे मांस खाल्ले. वानराची शिकार केल्याप्रकरणी संबंधिताला 3 वर्षांची कैद आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.
हे वानर अनुसूची- 2 वर्गातील वन्यप्राणी असून, त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 मधील अनुसूची क्रमांक 2 (परिशिष्ट 1) मध्ये समाविष्ट असणाऱ्या वन्यप्राण्याची शिकार केल्याने त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार कलम 9 आणि 51 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, जुन्नरचे उपवनसंरक्षक जयरामगौडा आर., सहायक वनसंरक्षक डी. वाय. भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.