कोकणातील ‘मेवा’ पुण्याच्या बाजारात

जांभळे, करवंदांच्या पाट्या बाजारात ग्राहकांचे घेताय लक्ष वेधून
दररोज 300 ते 400 बॉक्‍स जांभूळ, 40 डाग करवंदांची आवक
यंदा पाण्याच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम
जांभूळ प्रतिकिलो भाव : 80 ते 100 रुपये
करवंद प्रतिकिलो भाव : 20 ते 50 रुपये

पुणे – रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आणि डोंगरची मैना असलेल्या करवंदांची कोकणातून आवक सुरू झाली आहे. चवीला काहीशी तुरट-गोड, गडद रंग असलेले जांभळे आणि करवंदांच्या पाट्या बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून दररोज 300 ते 400 बॉक्‍स जांभूळ आणि 40 डाग करवंदाची आवक होत आहे. यापुढे जांभळांसह करवंदाची मोठी आवक अपेक्षित असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. साधारण मे महिन्याच्या मध्यावधीनंतर जांभूळ आणि करवंदाची आवक सुरू होते. यावर्षी दुष्काळाचा परिणाम उत्पादनावर झाला असल्याचे सांगून व्यापारी पांडुरंग सुपेकर म्हणाले, सध्यस्थितीत सावंतवाडी, महाड, रत्नागिरी, कणकवली आदी परिसरांतून जांभूळ, करवंदे बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून मालाचा दर्जाही खालावला आहे. आवकच्या तुलनेत बाजारात जांभूळ, करवंदांना मागणीही अधिक असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

मार्केटयार्डातील फळविभागात दररोज 300 ते 400 बॉक्‍स जांभळाची आणि 30 ते 40 करवंदाच्या डागांची आवक होत आहे. जांभळाच्या प्रतिकिलोस 80 ते 100 रुपये आणि करवंदाला 20 ते 50 रुपये भाव मिळत आहे. बाजारात गुजराती आणि कर्नाटक जांभळांचीही चांगली आवक होत आहे. त्याच्या प्रतिकिलोस 80 ते 180 रुपये भाव मिळत आहे. कोकणातील जांभळाच्या तुलनेत गुजराती जांभूळ ही गोड आणि आकाराने मोठी असतात. तर, कोकणी जांभळे ही काहीशी तुरट, रंगाने गडद असतात. त्यांना पल्प तयार करणाऱ्यांकडून मागणी राहाते. सध्यस्थितीत जांभळाची आवक साधारण असून येत्या दहा दिवसांत ती आणखी वाढेल. कोकणातील जांभळांचा हंगाम जून अखेरपर्यंत सुरू राहील असा अंदाजही सुपेकर यांनी वर्तविला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×