प्रवाशांच्या समस्यांना फुटणार वाचा

प्रवाशांच्या तक्रारी, समस्या जाणून घेणार
पीएमपीएमएल प्रशासन पुन्हा राबविणार “प्रवासी दिन’
पुणे – प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडी-अडचणी, समस्या तसेच पीएमपीएमएल संदर्भात इतर कुठल्याही प्रकारची समस्या थेट प्रवाशांकडूनच जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणारा “प्रवासी दिन’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 2014 मध्ये हा उपक्रम पीएमपीएमएलने सुरू केला होता. तो अवघ्या 2 वर्षांतच बंद पडल्याने 2016 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. तर 2017 मध्ये पुन्हा हा बंद पडला. त्यानंतर आता 2019 पासून तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्यातील पहिला शनिवार यासाठी निवडण्यात आला असून येत्या 1 जूनपासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना पुन्हा आपल्या समस्या व सूचनांसाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

शहर परिसरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सुमारे दोन हजार बसेसच्या माध्यमातून 300 पेक्षा जास्त मार्गांवर सेवा दिली जाते. यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात मिळून पीएमपीएमएलचे 13 डेपो आहेत. सद्यस्थितीत रोज सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या जाणवतात. ज्या परिसरातून प्रवासी येतात, अशा ठिकाणी बसथांबा व्यवस्थित नसणे, गाड्यांची संख्या कमी असणे, थांब्यावर गाडी न थांबणे, चालक-वाहकाचे उद्धट वर्तन, विशिष्ट मार्गावर गाडीचे सातत्याने ब्रेकडाऊन होणे अशा अनेक समस्या जाणवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी आणि सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा बंद असलेला हा उपक्रम महिन्यातील एक दिवस प्रवासी दिन म्हणून सुरू करण्याचे ठरवले आहे. या दिवशी प्रत्येक डेपोतील डेपो मॅनेजर यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे सोपे जाणार आहे. जूनपासून महिन्याचा पहिल्या शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत प्रत्येक डेपो मॅनेजर डेपोमध्ये उपस्थित राहून प्रवाशांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

जूनपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत पीएमपीएमएल डेपोत “प्रवासी दिन’ साजरा केला जाईल. यावेळी सर्वसामान्य प्रवाशांना आपल्या परिसरातील पीएमपीएमएल विषयीच्या समस्या, अडीअडचणी प्रशासनाला सांगता येणार आहेत. तसेच, यावर प्रशासन काय कार्यवाही करत आहे, याची माहिती त्यांना मिळेल.

– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)