निगडी, (वार्ताहर) – प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित, प्रा. वसंत कानेटकर लिखित, प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे अजरामर नाटक ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे संघाच्या ज्येष्ठ कलाकारांनी निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात सादर केले.
नाटकाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या नाटकाचा प्रयोग अत्यंत नेटका, बहारदार आणि एखाद्या व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा झाला असे मत प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले.
नाटकाचे दिग्दर्शन अशोक अडावदकर यांनी केले. या नाटकात ज्योती कानेटकर (प्रियंवदा), सुभाष भंडारे (बाजीराव), अनुराधा पेंडुरकर (बब्बर), चंद्रशेखर जोशी (बच्चू), सुनिता येन्नूवार (सुशील), सतीश सगदेव (निळूभाऊ) आणि अशोक अडावदकर प्रा. बल्लाळ) या भूमिका उत्तम रीतीने सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
सर्व कलाकारांचा सत्कार माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या नाटकासाठी डॉ. ज्योती इंगोले, नाट्य समिती प्रमुख, ज्येष्ठ नागरिक संघ प्राधिकरण यांचे सहकार्य लाभले.