मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर स्थगिती दिली आहे. याच विषयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती निर्णय हा धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही. पण न्यायालयाने त्यांचा निर्णय दिलाय. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक राजकीय हेतून कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत व्यक्त केले आहे. काही लोकांना असे वाटतंय की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी संभ्रम करणारी वक्तव्य टाळावीत. काही लोकं राजकीय हेतून कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही. केंद्राला पक्षकार करणे याचिकाकर्त्यांच्या हातात. केंद्राला पक्षकार करुन काही उपयोगही नाही. केंद्राकडं बोट दाखवणं ही पळवाट आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला कोर्टाला सांगायचा आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला स्थगिती का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा. इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. राज्य सरकार अंगावर काही घेत नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधीतज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले. कुंभकोणीएवजी थोरांतांकडे केस द्यावी, त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असं देखील ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.