चौदा दिवसांच्या बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे – लष्करी वैद्यकीय सेवेतील महत्त्वाची संस्था असलेल्या पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कर्डिओ थोरासिक सायन्स (एआयसीटीएस)च्या वैद्यकीय टीमने एक महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. संस्थेतर्फे एका चौदा दिवसांच्या बाळाच्या हृदयाची हालचाल सामान्य करण्यासाठी पेसमेकर हे विद्युत उपकरण बसवले.

पुण्यात सेवारत असलेल्या लष्करी जवानाच्या चौदा दिवसांच्या बाळाच्या हृदयात ब्लॉक असल्याचे निदान झाले. त्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा कमी होते. या बाळाला पुढील चाचण्यांसाठी एआयसीटीएस या संस्थेकडे पाठवले. याठिकाणी केलेल्या सविस्तर चाचण्यांमध्ये हा दुर्मिळ प्रकारातील विकार असून, दर 22 हजार बाळांमागे एकाला ही समस्या होत असल्याचे समोर आले. तसेच यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगण्यात आले.

तसेच यासाठी विद्युत उपकरण वापरणे योग्य ठरेल, असे ठरविण्यात आले. त्यानुसार एआयसीटीएसच्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमने बाळाच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली. याद्वारे बाळाच्या शरीरात कायमस्वरूपी पेसमेकर हे विद्युत उपकरण बसविले. यामुळे बाळाच्या हृदयाच्या हालचाली सामान्य होण्यास मदत मिळणार आहे. संस्थेच्या वैद्यकीय टीमसाठी हे एक मोठे यश आहे. सध्या बाळाला घरी सोडले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे एआयसीटीएस संस्थेतर्फे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.