मिनीपोलिस – अमेरिकेत कोविडने सर्वाधिक धुमाकुळ घातला असून त्या देशात आत्तापर्यंत कोविडने मरण पावलेल्यांची संख्या सात लाखांवर गेली आहे. कोविड 19 ची मुख्य लाट कमी झाल्यानंतर येथे याच रोगाच्या डेल्टा विषाणुने कहर केला. तथापि आता काहीं प्रमाणात ही लाट ओसरू लागली आहे.
त्यामुळे कायम रूग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या येथील रूग्णालयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मृतांचे सहा लाखांचे प्रमाण सात लाखांवर जाण्यास तीन महिन्यांचा अवधी लागला.
अमेरिकेत कोविडची लस सहजपणे उपलब्ध असूनही तेथील अनेक नागरीकांनी ती लस घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. नंतर या लसीचे दोन्हीं डोस घेणाऱ्यांनांही कोविडची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. पण ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यातील मृतांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आल्यानंतर ही लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
तथापि अजूनही अमेरिकेतील सात कोटी लोकांनी ही लस घेतलली नाही असे सांगण्यात येते. अमेरिकेतील कोविड आता आटोक्यात आला असला तरी बाधित रूग्णांची प्रमाण अजूनही लक्षणीय असेच आहे.