भारतीयांच्या ‘सेवाभावी’ वृत्तीमुळेच करोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी

नागपूर – जागतिक स्तरावर अन्य देश करोना नियंत्रणासाठी हतबल झाले असताना भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महालसीकरणाला सुरुवात केली आहे. हे सर्व भारतीय जनतेच्या मनामनात असणाऱ्या दयाभाव व सेवावृत्तीमुळे शक्‍य झाले आहे.

त्यामुळेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले आहे. नागपूर येथील राजभवन येथे आयोजित “कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसऍबिलिटी’ संस्थेमार्फत आयोजित करोना योद्‌ध्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.

भारतीय संस्कृतीमध्ये सेवाभावाला सर्वाधिक महत्त्व आहे. वेगवेगळ्या विचार प्रवाहात असणाऱ्या सर्व समुदायाकडे श्रद्धेने काम करण्याचा एक स्थायीभाव ईश्वरी देणगी प्रमाणे लाभला आहे. त्यामुळेच 130 कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये आम्ही उत्तम काम करू शकलो. करोना साथीच्या आजारांमध्ये अनेकांनी पगार नसतानादेखील काम केले.

अनेक संकटे उभी ठाकली असताना देखील प्रत्येक जण सेवेसाठी पुढे आले. अशा पद्धतीने दयाभाव दाखवत दुसऱ्याला मदत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर भारत या संकटावर प्रभावीपणे मात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.