“ऑप्ट-आउट’ पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे – कंपनी सेक्रेटरीची (सीएस) परीक्षा डिसेंबरऐवजी जूनमध्ये देता येणार आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) विद्यार्थ्यांना “ऑप्ट-आउट’ पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
करोना प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा द्यायची नाही, त्यांच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी डिसेंबर 2020 मध्ये सीएस परीक्षेत भाग घेऊ इच्छित नाहीत आणि जून 2021 च्या परीक्षेस हजेरी लावू इच्छितात. त्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आयसीएसआय “ऑप्ट-आउट’ ऍप्लिकेशन लिंकद्वारे अर्ज करावा. कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन प्रोग्राम, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्रामच्या एकत्रित परीक्षा 21 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.
विद्यार्थ्यांना “ऑप्ट-आउट’साठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा अर्ज 15 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाइन भरायचा आहे. यासंदर्भात “आयसीएसआय’ने 4 डिसेंबर रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. तसेच विद्यार्थी ऑप्ट-आऊटसाठी अर्ज करणार असतील तर त्यांनी 20 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत त्यांचा स्वत:चा किंवा जवळच्या नातेवाईकांचा कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट पुरावा म्हणून सादर करायचा आहे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
सीए फाउंडेशनची परीक्षा लांबणीवर
चार्टर्ड अकाउंटंटस् फाउंडेशनची परीक्षा मंगळवारी (दि.8) होणार होती. मात्र देशभरात मंगळवारी भारत बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउंटंटस् ऑफ इंडियाने घेतला आहे. आता ही परीक्षा दि. 13 डिसेंबर रोजी होणार आहे.