कोविड लसीकरणासाठी जिल्हास्तरीय कृतीदल

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपशीलवर सादरीकरण

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपशीलवर सादरीकरण

 

पुणे  – कोविड लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृतीदलाची स्थापना करण्यात आली असून, त्यासंदर्भातील तपशीलवार सादरीकरण सोमवारी करण्यात आले.

 

या कृतीदलात पोलीस अधिक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता, महिला-बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा प्रशासन अधिकारी, तिन्ही कॅन्टोंमेंटचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आदींसह शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना वगैरे विभाग प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे.

 

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील 31,915 आरोग्य कर्मचाऱ्यांना ती देण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे.

 

केंद्राच्या सूचनेनुसार “कोविड वॅक्सीनेशन बेनिफिशरी मनेजमेण्ट सिस्टिम’ (सीव्हीबीएमएस) हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यामध्ये सर्व आरोग्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करून अपलोड करण्यात येणार आहे. या पोर्टलवर ग्रामीण भागातील एकूण 2,536 सरकारी आणि खासगी आरोग्य संस्थांची माहिती आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी यांची माहिती भरता येईल.

सरकारी आरोग्य संस्थे अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कॅन्सर, टीबी आणि इतर आजारांसाठी सरकारी रुग्णालय, आयुष हॉस्पिटल, डिस्पेंसरीज, महापालिका-नगरपालिका अंतर्गत असलेले प्रसूतिगृह, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. तर खासगी आरोग्य संस्थेंतर्गत कॉर्पोरेट हॉस्पिटल, खासगी महाविद्यालय, नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक, एनजीओ मार्फत चालवले जाणारे रुग्णालय, ओपीडी क्लिनिक आदी येतात.

 

लसीकरणांतर्गत एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा, आशा स्वयंसेवक, आशा पर्यवेक्षिका, सुपरवायजर पीएचएन, एलएचव्ही, सीएचओ, नर्सिंग स्टाफ, आरोग्य पर्यवेक्षिका, तालुका विस्तार अधिकारी, आरोग्य, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये एमबीबीएस, एमडी ऍलोपॅथी डॉक्टर्स, शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ, आयुष डॉक्टर्स आणि डेन्स्टिस्ट, वैद्यकीय संशोधनांतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचारी, वैद्येकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, आयुष पॅरामेडिकल विद्यार्थी, सहाय्यक वर्गात डायटिशियन, बीएमडब्ल्यू स्टाफ, साफसफाई कर्मचारी, रुग्णवाहिकेचे चालक आणि इतर कर्मचारी जे आरोग्य संस्थेत काम करत असतील. क्लार्क आणि प्रशासकीय स्टाफ ज्यात डीईओ, इंजिनीअर, क्लार्क आणि आरोग्य संस्थेत काम करणारे कर्मचारी, यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.