करोना विषाणू हवेतूनच फैलावतात; जगभरातील 200 वैज्ञानिकांदावा

 

 

न्युयॉर्क, – करोनाचे विषाणू हवेतून फैलावत असल्याचा निष्कर्ष जगभरातील 32 देशांच्या दोनशेपेक्षा अधिक वैज्ञानिकांनी काढला असून त्यांनी तसे अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला पाठवले आहेत. या विषाणूंचे अगदी छोटे पार्टिकल्ससुद्धा मनुष्याला संसर्ग करण्यास पुरेसे ठरतात त्यामुळे हा प्रकार अधिक धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आधी करोनाचा विषाणू प्रामुख्याने खोकला किंवा शिंकेतील तुषारांतून पसरतो असे म्हटले होते.

वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला जे अहवाल सादर केले आहेत त्यातील निष्कर्षावरून न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आज जागतिक पातळीवर सर्वत्रच लोक पुन्हा बार, रेस्टॉरंट, कार्यालये, मार्केट, कॅसिनो अशा ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. तेथे हवेतून मोठ्या प्रमाणात या विषाणूंचा फैलाव होत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 32 देशांतील 239 वैज्ञानिकांनी या नवीन संशोधनानुसार आता जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या शिफारशींमध्ये आवश्‍यक ते फेरबदल करावेत अशी सूचना केली आहे.

खोकला किंवा शिंकेद्वारे जे तुषार बाहेर पडतात त्यातून करोना मोठ्या प्रमाणात फैलावत असतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने आधी म्हटले होते. त्यामुळे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सतत हात धुणे असे उपाय या संघटनेने सुचवले होते. तथापि, हा विषाणू हवेतूनच फैलावत असल्याने गर्दीच्या ठिकाणी त्याचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे, असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. जिथे हवेशीर वातावरण नाही अशा भागात त्याच्या प्रसाराचा वेग अधिक आहे.

ज्या बंदिस्त ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी खेळती हवा राहील याची दक्षता घेणे आता अधिक आवश्‍यक बनले आहे. अशा बंदिस्त ठिकाणी हवेचे शक्‍तिशाली फिल्टर्सही लावणे आवश्‍यक बनले आहे, असे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्ग नियंत्रण विभागाचे प्रमुख बेनेडेट्टा अलेग्रांझी यांनी मात्र वैज्ञानिकांच्या या दाव्यावर शंका उपस्थित केली असून त्यांनी म्हटले आहे की हा विषाणू हवेतून फैलावतो या दाव्याला पुरेसा आधार नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.