अधिवेशनात महिलांवरील हल्ल्याबाबत कडक कायदा आणणार

उपमुख्यमंत्री अजित पवार ः नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय
सांगली :  महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विचार करता याबाबत कडक कायदा आणण्यात येईल.मात्र याबाबत सर्वच पक्षांनी कसल्याही पद्धतीचे राजकारण आणता कामा नये. याबाबत येत्या  योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ दोन लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचबरोबर 2 लाखांवर पीक कर्ज व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या जन्मगावी अंजनी येथील समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करुन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार सुमन पाटील उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आबा हे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. ते सामान्य माणासाचे हित जोपासून त्यांना आवश्‍यक अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळून त्या खात्यांची उंची वाढविली.

आबांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील ज्या गावांना सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही त्या गावांत पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमन पाटील यांनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील. या कामांना आवश्‍यक असणारा निधी प्राधान्याने दिला जाईल.

सरकारला कोणताही धोका नाही
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका असणार नाही. यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देणे गरजेचे नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका विषयावर प्रतिक्रिया दिल्यानंतर परत आम्ही त्या विषयावर प्रतिक्रिया देणे हे योग्य नाही. पवार साहेबांचे प्रतिक्रिया हीच संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रतिक्रिया आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.