सविंदणे, {अरुणकुमार मोटे} – सन २०२३-२४ च्या कालावधी मध्ये पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल जमा करण्याचा आदेश सहकार विभागाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेला दिला आहे. त्यामुळे ६ टक्के व्याज शेतकऱ्यानी भरु नये. ज्या शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरली आहे. त्यांना ती परत मिळणार असल्याचे कवठे येमाई, जांबुत येथील कर्ज विकास आधिकारी राजेंद्र चाटे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून २ वर्षांचे ३ टक्क्याप्रमाणे व्याज मिळाले नसल्याने त्यावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने एक वर्षांचे व्याज थकवले आहे. मागील एका वर्षाचे ३ टक्के व्याज केंद्र सरकारने अद्यापही दिले नाही. राज्य सरकारकडून २ वर्षाचे ३ टक्यांप्रमाणे व्याज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर फसवणूक केंद्र व राज्य सरकार करीत आहे.
शासनाने शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने पिककर्ज वाटप करण्याचे केंद्र व राज्य सरकारने धोरण आहे. परंतू अचानक मार्च २०२२ अखेरीस केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून मुद्दलीसह प्रत्येकी ३ टक्के, असे ६ टक्के रक्कम व्याजासहित वसूल केले होते. परंतू तब्बल एक वर्ष महिने उलटूनही अद्यापही शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारकडून व्याज परत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शेतकरी व्याजाचे पैसे मिळवण्यासाठी वारंवार सोसायट्यांमध्ये हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत. आता व्याजासहित पीक कर्ज भरावे लागणार नाही. परंतू मागील व्याज कधी जमा होणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
दोन वर्षांपासून ६ टक्के पठाणी वसुली
यापूर्वी राज्य सरकार व केंद्र सरकार आधीच व्याज भरत होते. परंतु आता त्यांनी व्याज न भरल्यामुळे शेतकऱ्यांकडून गेल्या दोन वर्षापासून मार्च अखेरीस पिककर्जाच्या मुद्दलीच्या ६ टक्के व्याजासह रक्कम तालुक्यातील विविध विकास कार्यकारी संस्थांनी वसूल केली आहे.
ते व्याज न मिळाल्याने शेतकरी पिककर्ज भरण्यास तयार होत नव्हता. परंतू आता पूर्वीप्रमाणे व्याज न भरता फक्त मुद्दल जमा करण्याचे आवाहन शिरूर तालुक्यातील विविध विकास सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकरी उधार, उसनवार करून पीककर्ज वेळेत नवीन जुने करीत आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच आता फक्त मुद्दल भरण्याचे आवाहन राज्य व केंद्र सरकारने केल्याने शेतकऱ्यांची हेळसांड थांबवली आहे. मागील वर्षाचे व्याज जमा करण्याची आग्रही मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.