पौड-कोळवण रोडवर गतिरोधक बाबतच्या मागणीची घेतली दखल
पौड – “सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय बांधकाम विभागाकडून मुळशीतील नागरिकांना अनुभवायला मिळाला. एक वर्षांपासून दिलेल्या निवेदनाची दखल घेत पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या समोर तसेच करमोळी येथील गावाच्या लगत गतिरोधक बसवण्यात आले आहेत. गतिरोधक बसवण्यात यावे याकरिता दैनिक प्रभातने वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्याने याचा प्रभात इफेक्ट नक्कीच झाला आहे.
पौड-कोळवण नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले असून बऱ्याच दिवसांनी रस्ता हा खड्डेमुक्त झालेला असल्यामुळे चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहने यांचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांची पौड-कोळवण रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून रोडच्या कडेला असलेल्या शाळा, ज्या गावांमधून रस्ता गेला आहे.
अशा वर्दळीच्या ठिकाणी, गतिरोधक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंदा केदारी, पौड ग्रामपंचायतच्या वतीने माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोनाली ढोरे, ऍड. सागर ढोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य किरणकुमार आगनेन, ग्रुप ग्रामपंचायत चाले, तसेच मुळशीतील सामाजिक संघटनेने बांधकाम विभाग मुळशी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, याठिकाणी गतिरोधक करण्याची मागणीबाबत दैनिक प्रभातने वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेतली आहे.